मैत्रीपूर्ण लढतही भोवली
By admin | Published: February 25, 2017 02:43 AM2017-02-25T02:43:54+5:302017-02-25T02:43:54+5:30
शहरातील अनेक प्रभागांमध्ये सबंध पॅनेल निवडून येण्याचे प्रमाण अधिक असताना रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७) प्रभागात क्रॉस व्होटिंग झाले.
विश्वास खोड, पुणे
पुणे : शहरातील अनेक प्रभागांमध्ये सबंध पॅनेल निवडून येण्याचे प्रमाण अधिक असताना रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७) प्रभागात क्रॉस व्होटिंग झाले. राष्ट्रवादीचे २, शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी १ उमेदवार या प्रभागाने पालिकेवर पाठविले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना ३ गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्याने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा एका गटामध्ये भाजपाला तर दुसऱ्या गटामध्ये शिवसेनेला झाला.
अ गटासाठी मागासवर्गीय महिला, ब साठी सर्वसाधारण महिला, आणि क व ड गट खुल्या प्रवर्गासाठी असे आरक्षण होते. त्यामुळे अ गटामधून राष्ट्रवादीच्या लक्ष्मी उदयकांत आंदेकर, ब गटामधून सुलोचना तेजेंद्र कोंढरे, क गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर आणि ड गटामधून शिवसेनेचे विशाल धनवडे निवडून आले.
क गटामध्ये एमआयएम, बसपा, मनसे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे ६ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसशी मैत्रीपूर्ण लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर यांनी बाजी मारली. या गटामध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा तोटा राष्ट्रवादीला झाला नाही. आंदेकरांनी वर्चस्व सलग राखण्यात यश मिळविले. लक्ष्मी आणि वनराज यांचे पुतण्या-चुलतीचे नाते आहे. वनराज यांना रोखण्यासाठी भाजपाने तोडीस तोड उमेश चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने या प्रभागात कांटे की टक्कर होती. मात्र चव्हाण यांना अपेक्षित मते मिळविण्यात अपयश आले.
ड गटामध्येही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत झाली. येथेही दोन्ही काँग्रेसच्या मतांची बेरीज विजयी उमेदवारापेक्षा अधिक होते. शिवसेनेचे विशाल धनवडे यांना १२,४२३, राष्ट्रवादीचे सागर पवार यांना ७५१४ मते मिळाली, काँग्रेसचे राजू ऊर्फ समीर शेख यांना ५९८५ मते मिळाली. मराठा मोर्चानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारालाच संधी देण्याच्या मागणीचा काहीसा परिणाम होऊन ड गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मते कमी झाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जाते. राष्ट्रवादीवरच्या नाराजीचा फायदा शिवसेनेला झाला. भाजपाचे अरविंद कोठारी यांना २६६ मतांनी पराभव पत्करावा लागला.