दोस्त आपुला पाऊस आला, उघडा खिडके दारे! ना कडकडाट ना गडगडाट ‘तो’ बसरतोय शांतपणे
By श्रीकिशन काळे | Published: June 25, 2023 01:21 PM2023-06-25T13:21:48+5:302023-06-25T13:22:02+5:30
उशीरा का होईना, पण सर्वांचा दोस्त असणारा पाऊस सुटीच्या दिवशी पुण्यात अवतरला
पुणे : उशीरा का होईना, पण सर्वांचा दोस्त असणारा पाऊस सुटीच्या दिवशी पुण्यात अवतरला आहे. नेहमीप्रमाणे येणारा मॉन्सून यंदा रविवार पाहूनच आला आहे. त्यामुळे मनसोक्त आणि मनमुक्त तो बरसत आहे. हवामान खात्याने आज जाहीर केले की, मॉन्सून पुण्यात आला. त्यामुळे आता पुणेकरांना चिंता नाही. कसलाही गडगडाट व कडकडाट न करता शांतपणे सकाळीच बरसायला सुरवात झाली आहे.
कधी येणार मॉन्सून ? असा सतत पुणेकरांना छळणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने आज दिले आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस शनिवारी आला आणि त्यानंतर रविवारी मॉन्सून अधिकृत आल्याची घोषणा हवामान खात्याचे महासंचालक अनुपम कश्यमी यांनी केली. गेले कित्येक दिवस निरभ्र असणारे आकाश आता संपूर्ण काळ्याशार जांभुळ पिकल्यावानी भरून गेले आहे. विजांचा कडकडाट न करताच सकाळपासून ‘तो’ बरसत आहे. कोणताही गाजावाजा न करता उशीरा आल्यावर कोणी कसे निमूटपणे येते, अगदीच तसेच अवचित येऊन हा पाऊस कोसळत आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्येही शनिवारपासून त्याने चांगली हजेरी लावली आहे. घाटात आणि धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. लोणावळा परिसरात शनिवारी ५४ मिमी पावसाची नोंद झाली. तर शिरगाव ३० मिमी, भिवपुरी ६६, कोयना ३२, खोपलोली ५८, ताम्हिणी ५६ अशी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या मॉन्सून अतिशय स्ट्रॉग असून, तो आज दिवसभर बसरणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. मॉन्सूनने शनिवारपासून चांगला वेग पकडला असून, संपूर्ण भारतात तो पसरत आहे. जवळपास ९० टक्के त्याने भारत व्यापला आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस
लोणावळा : ६१ मिमी
लवासा ३४.५ मिमी
बारामती २६.६ मिमी
माळीण २०.० मिमी
पाषाण १८.० मिमी
हडपसर १५.० मिमी
शिवाजीनगर १४.५ मिमी
कोरेगाव पार्क १४.०
दौंड १३.५ मिमी
चिंचवड १२.५ मिमी
वडगाव शेरी १२.० मिमी
हवेली ९.५ मिमी