‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा
By नम्रता फडणीस | Updated: February 25, 2025 19:31 IST2025-02-25T19:30:32+5:302025-02-25T19:31:21+5:30
गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा आहे

‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा
पुणे: ‘मस्ती आली आहे साल्याला मारा, असे म्हणत गजा मारणे आणि रूपेश मारणे या दोघांनी आपल्या साथीदारांना चिथावणी दिल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात केला. संबंधित तरुण व आरोपींमध्ये पूर्व वैमनस्य होते का, याबाबत तपास करायचा आहे. याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यावर विशेष न्यायालयाने गजा मारणे, याला ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
अभियंता तरुणाला मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. कोथरूड पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गजा मारणे हा हजर झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी त्याला रात्री अटक केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले.
गजानन मारणे याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याचे साथीदारांनी यातील फिर्यादीस भर चौकात सार्वजनिक ठिकाणी खून करण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी केले आहे. या गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यामागे नक्की कारण काय आहे. आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून गुन्ह्यातील पाहिजे. आरोपींच्या ठावठिकाण्याची माहिती घेऊन त्यांना अटक करायची आहे. आरोपीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण चालू असून तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, काय याबाबत तपास करायचा आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या गुन्ह्यात आतापर्यंत दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अटकेतील आरोपींकडून उडवाउडवी
अटकेतील आरोपी अपेक्षित माहिती देत नसून, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तपासास सहकार्य करत नाहीत. या आरोपींना संघटित गुन्हेगारी करून बेकायदेशीरपणे स्थावर अथवा जंगम मालमत्ता प्राप्त केली आहे, याबाबत तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा असल्याने १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली.
आरोपीच्या मूलभूत मानवाधिकाराचे उल्लंघन
आरोपीचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी या मारामारीशी आरोपी गजानन मारणे याचा काही संबंध नाही. दबावामुळे पोलिसांनी ६ दिवसांनंतर त्यात गजानन मारणे याचे नाव समाविष्ट केले आहे. गजानन मारणे स्वतःहून हजर झाला असतानाही त्याला फरशीवर बसवून नकळत छायाचित्र काढून व्हायरल केले जात आहेत. त्याला औषधोपचार नाकारले जात आहेत. हे अटक आरोपीच्या मूलभूत मानवाधिकाराचे उल्लंघन आहेत. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी तक्रार न्यायालयात केली. पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात गोवले असून, किरकोळ मारहाणीच्या गुन्ह्यात जिवे मारण्याचे व ‘मोक्का’चे कलम लावले आहे. आरोपीने चिथावणी दिल्याचा उल्लेख तक्रारदाराच्या जबाबात नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणातही आरोपी दिसत नाही, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला.