कोंढवा पोलीस ठाण्यात रंगला ‘मैत्री मेळावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:55 PM2018-05-07T13:55:33+5:302018-05-07T14:19:58+5:30
आपल्या कृतीतून शांतता, सामाजिक ऐक्य , बांधिलकी जपणाऱ्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या मंडळे व कार्यकर्त्यांचा मैत्री मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पुणे : गणेशोत्सव असो की ईद , महापुरुषांच्या जयंत्या असो की सण... पोलिसांची डोकेदुखी ठरलेलीच...कार्यकर्त्यांच्या उत्साहाला वेसण घालताना पोलिसांना नाकी नऊ येतात...मात्र, काही जबाबदार मंडळे आणि कार्यकर्ते पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजात आदर्श प्रस्थापित करतात. अशाच काही मंडळांचा आणि कार्यकर्त्यांचा ‘मैत्री मेळावा’ कोंढवा पोलीस ठाण्यात पार पडला. यावेळी सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुदाम पाचोरकर, सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद, विलास तोगे आदी उपस्थित होते. पोलिसांच्या कामामध्ये नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकच पोलिसांचे डोळे आणि कान आहेत. लोकाभिमुख पोलिसींगसाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनीही हक्कांबाबत जागरुकता ठेवताना जबाबदा-या आणि कर्तव्याची जाणीव जपणेही आवश्यक असल्याचे मत यावेळी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी पुस्तकांची दहिहंडी केल्याबद्दल आदित्य अॅकेडमी, अखिल शिवनेरीनगर दहिहंडी उत्सव यांचा सत्कार केला. तर, श्रीमंत साईनाथ तरुण मंडळाने पाणी बचतीचा संदेश दिला, शिवप्रेमी हनुमान मंदळाने मिरवणूक न काढता शांतता प्रस्थापित केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर, हजरत मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करताना विना स्पिकर मिरवणूक काढलेल्या लबैक यंग सर्कल व शांततेत मिरवणूक काढलेल्या बज्मे इमदाद यंग सर्कल या मंडळांचा सत्कार केला. यासोबतच मोहर्रम मिरवणूक शांततेत पार पाडलेल्या मंडळाचे अध्यक्ष गुलाम हुसैन यांचा सत्कार करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अवयव दानाचे १३५ अर्ज भरुन घेतले. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केल्याबद्द्ल सत्कार करण्यात आला. कोंढबा बुद्रुक एक गाव एक शिवजयंती साजरी करणा-या १७ मंडळांचा सन्मानही करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आरोग्य शिबीराचे आयोजन करणा-या लॉर्ड बुद्ध फाऊंडेशन ट्रस्टचा तसेच गौतम बुद्ध जयंतीनिमित्त १५ मंडळांनी एकच मिरवणूक काढल्याने अखिल वानवडी-महम्मदवाडी-कृष्णानगर-कोंढवा भगवान बुद्ध व डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव कमिटीचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक गणेश कुल्हाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केले.
....................