मुलीशी मैत्री खटकली; वाघोलीत बाप अन् भावाने काटा काढला…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:56 IST2025-01-02T10:55:59+5:302025-01-02T10:56:52+5:30
या थरारक घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलीशी मैत्री खटकली; वाघोलीत बाप अन् भावाने काटा काढला…
- किरण शिंदे
पुणे - वाघोलीतील वाघेश्वर नगर भागात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मुलीच्या वडील आणि दोन भावांनी मिळून एका १७ वर्षीय अल्पवयीनचा लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून निघृण खून केला. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडवली आहे.
प्रेमप्रकरणाचा राग मनात धरला
गणेश तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून, तो लक्ष्मण पेटकर यांच्या मुलीसोबत मैत्री करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश आणि मुलगी नियमितपणे बोलत असत. मात्र, हा संबंध लक्ष्मण पेटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. या रागातूनच खुनाचा कट रचण्यात आला.
मध्यरात्री घडलेली थरारक घटना
घटना मंगळवारी मध्यरात्री १२:३० ते १ च्या सुमारास वाघोलीतील वाघेश्वर नगर परिसरात घडली. गणेश हा नेहमीप्रमाणे मित्रासोबत फिरत असताना, लक्ष्मण पेटकर (६०), नितीन पेटकर (३१) आणि सुधीर पेटकर (३२) यांनी त्याला गाठले. या तिघांनी मिळून गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. हल्ला इतका क्रूर होता की, गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आरोपींवर गुन्हा दाखल
या भयंकर घटनेनंतर पोलिसांनी लक्ष्मण पेटकर यांना ताब्यात घेतले असून, नितीन आणि सुधीर पेटकर यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या थरारक घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या मित्रासोबत बोलण्याचा राग इतका टोकाला जाईल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पुढील तपास सुरू
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे, तर परिसरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.