‘त्यांच्या’ही आयुष्यात फुलतेय मैत्रीचे नातं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:10+5:302021-08-01T04:12:10+5:30
पुणे : 'त्यां'चं वागणं, बोलणं, चालणं, पाहणं आजही समाजातील बऱ्याच जणांना खटकतं. कायद्याने त्यांना 'माणूस' म्हणून जगण्याची ताकद दिली, ...
पुणे : 'त्यां'चं वागणं, बोलणं, चालणं, पाहणं आजही समाजातील बऱ्याच जणांना खटकतं. कायद्याने त्यांना 'माणूस' म्हणून जगण्याची ताकद दिली, पण समाजाने खुल्या मनाने स्वीकारण्याची हिंमत दाखविलेली नाही. कायम अवहेलनाच नशिबी आल्यानंतर त्यांच्यासाठी आजतागायत 'मैत्री'ही काही कोसो दूरच म्हणावी लागेल. पण समाजात आता कुठे परिवर्तनाची नांदी सुरु झाली असून, 'तृतीयपंथीयां'च्या जीवनातही मैत्रीची पहाट उजाडू लागली आहे. मैत्रीदिनाच्या निमित्ताने तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील 'मैत्री' ची गोष्ट उलगडली आहे.
तृतीयपंथीयांच्या आयुष्यात नकळत्या वयापासूनच ही मैत्री दुरापास्त. त्यांच्या दृष्टीने मैत्री ही त्यांच्या समाजापुरती सीमित होती. पण सर्व सामान्यांच्या जीवनातली नि:स्वार्थ मैत्री त्यांच्याही जीवनात फुलू लागली आहे. यात मुलं आणि मुलांकडूनही तृतीयपंथीयांशी मैत्रीचे कवाडे खुली होऊ लागली आहे.
याबाबत सोनाली दळवी यांनी सांगितले, आजपर्यंत आम्ही एका चौकटीपुरतीच मर्यादित होती. पण आता आमच्याकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात बदल होतो आहे. नातं, वय, लिंग, शारीरिक आकर्षण या सर्व मर्यादांच्या कक्षेपलीकडचं मैत्रीचं नातं आहे. माणूस म्हणून पाहिलं की मैत्रीचं नातं आणखी सुरक्षित आणि तितकंच निर्मळ होते. पण मैत्रीच्या नात्याला गालबोट लावणाऱ्या अनेक घटना अवतीभवती घडताना दिसतात. समाजाची सर्व बंधने झुगारून मैत्रीच्या नात्याला आयाम देणाऱ्या मित्र- मैत्रिणीनी माझं जगणं खरोखर समृद्ध केलं आहे.
चांदणी गोरे म्हणाल्या, खूपदा असे प्रसंग येतात की त्यावेळी खऱ्या अर्थाने मैत्रीच्या नात्याची किंमत कळते. पण अशावेळीच तुम्हाला नवी उमेद देणारं, मनापासून समजून घेणारं, मार्गदर्शन करणारं असं कुणीतरी हवं असते. आणि हे मैत्रीच्या उंबरठ्यावर जपणाऱ्या ठराविकच पण हक्काच्या मित्र-मैत्रिणी माझ्या आयुष्यात आहेत हे माझं भाग्य आहे. अवहेलनेच्या नजरेपेक्षा मैत्रीचा आधार खूप महत्वाचा ठरतो. याचपैकी एक मैत्रीण म्हणजे चैत्राली देशमुख आहे. तिने मला आजपर्यंत कठीण प्रसंगात कायमच पाठिंबा दिला आहे. स्वतःच्या लग्न सोहळ्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. ही माझ्या दृष्टीने फार सुखद धक्का देणारी गोष्ट होती. तसेच एक वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात नवीन मित्र आला आहे. जो मला सातत्याने प्रेरणा, पाठिंबा देत आहे. तो ही माझ्या मैत्रीच्या नात्याला, विश्वासाला सर्वार्थाने जपतो आहे. हीच मैत्री माझ्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. ती वृद्धिंगत होण्यासाठी मी दहा नाही शंभर पावलं पुढं टाकणार आहे. समाजाने फक्त दोन पावलं टाकणे गरजेचे आहे.