तीन दिवस धास्तावलो, पण नंतर वाचन, चिंतन करत कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:28+5:302021-05-05T04:17:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॉक्टरांची औषधे मदतीला होतीच, पण त्याला चांगल्या सकारात्मक विचारांची जोड देऊनच मी कोरोनावर मात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉक्टरांची औषधे मदतीला होतीच, पण त्याला चांगल्या सकारात्मक विचारांची जोड देऊनच मी कोरोनावर मात केली. कोरोना झाला म्हणून कोणीही, प्रामुख्याने वयोवृध्दांनी मुळीच घाबरून जाऊ नये, त्यावर निश्चितपणे मात करता येऊ शकते. वय वर्षे ८२ असलेले निवृत्त सहायक नगररचनाकार रा. ना. गोहाड हे सांगत असतानाही त्यांच्यात उत्साह होता.
८ एप्रिलला सायंकाळी त्यांना अचानक उलट्या सुरू झाल्या. लगेच त्यांना शहरातील एका मोठ्या रुग्णालयात नेले. तिथे त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. अॅडमिट करा म्हटले तर हॉस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले जागाच नाही. मग तिथून कोथरूडला गेले. तिथे तासभर थांबूनही जागा नाहीच मिळाली. मग आणखी एक रुग्णालय, तिथेही नकारघंटाच. शेवटी पहाटे साडेचारला घरी आले, झोपले व सकाळी ऊठून केईएमला गेले. तिथे ओळख असल्याने सोय झाली व कोरोना रुग्ण म्हणून दाखल झाले.
एप्रिल ९ पासून ते थेट १७ एप्रिलपर्यंत ते तिथेच अॅडमिट होते. केवढ्या तरी तपासण्या, औषधांचा मारा आणि कोरोनाच्या सतत वेगवेगळ्या बातम्या. गोहाड सांगतात, ‘सुरुवातीचे तीन दिवस धास्तावलेलेच गेले. पण नंतर हळूहळू चित्त स्थिर केले. मनात ज्ञानेश्वर माऊलींचे विचार घोळवू लागलो. मन त्यापासून ढळू लागले की लगेच संतसाहित्य आठवायचो. त्यावर चिंतन करायचो. वाचनही तेच ठेवले. डॉक्टरांचे सगळे म्हणणे आदराने ऐकायचो. प्रत्येक औषध या काळात प्रसाद म्हणूनच घेतले. आपण यातून बाहेर पडणार हा एकमेव विचार सतत करत राहिलो. औषधांचा परिणाम हळूहळू दिसू लागला. संसर्ग कमी होत चालला आहे, असे डॉक्टरांंनी सांगितले."
१७ एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडले, त्या वेळी ते ठणठणीत बरे झाले होते. तपासणीमध्ये आता संसर्ग नाही, असे आढळल्याचे डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले.
मानवाचा इतिहासच सांगतो की त्याने आतापर्यंत प्रत्येक साथीच्या आजारावर मात केली आहे. प्लेगची साथ या कोरोनापेक्षाही भयंकर होती, पण मानवाने प्लेगलाही नमवले व माघार घ्यायला लावली. कोरोनाही फार काळ टिकणारा नाही. आज ना उद्या माणूस त्यावर रामबाण उपाय काढेलच, असा विश्वास गोहाड यांनी व्यक्त केला.
वयोवृध्द व्यक्ती कोरोनामुळे घाबरून जाणे स्वाभाविक आहे, मात्र त्यांनी मन खंबीर ठेवावे. अडचणीच्या काळात आपला देव नेहमीच आपल्याबरोबर असतो. सकारात्मक विचार हेच एक मोठे औषध आहे. त्यामुळे कोरोना झाला तरीही घाबरू नये, असे आवाहन गोहाड यांंनी केले.