कौटुंबिक न्यायालयासमोरच पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:55 AM2018-06-20T00:55:26+5:302018-06-20T00:55:26+5:30
पोटगीच्या दाव्यासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या गेटवरच रॉकेल ओतून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
पुणे : पोटगीच्या दाव्यासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या गेटवरच रॉकेल ओतून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भरगर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ याप्रकरणी पतीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोहेल लतीफ पठाण (वय २६, रा. घोरपडी पेठ) असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आरबिन पठाण (वय २२) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल व आरबिन यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सोहेल यांनी तिहेरी तलाक दिला आहे. आरबिन यांना तो मान्य नाही. त्यानंतर त्यांनी पोटगी मिळावी यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. आरबीन यांनी यापूर्वीही सोहेलविरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी पोटगीची तारीख होती. त्यामुळे त्या कौटुंबिक न्यायालयात आल्या होत्या. सोहेलही त्या ठिकाणी आला. गेटवरच आरबिन यांना अडवत दावा पाठीमागे घ्यावा, यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्याने बाटलीतील रॉकेल त्यांच्या अंगावर ओतले. तसेच, त्यांना हाताने मारहाण केली.