पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण
By admin | Published: April 28, 2017 05:45 AM2017-04-28T05:45:02+5:302017-04-28T05:45:02+5:30
यवत पोलीस ठाण्यासमोरच एका युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांवर
यवत : यवत पोलीस ठाण्यासमोरच एका युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांवर तक्रार देऊनदेखील कसलीही कारवाई अथवा गुन्हे दाखल न झाल्याने उपोषण सुरू करण्यात आल्याचे उपोषणकर्ता मनोज मधुकर कांबळे याने सांगितले.
याबाबत दिलेल्या निवेदनात, गावातील अवैध धंद्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याने मनोज मधुकर कांबळे यांच्यावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले. तरीही गप्प बसत नसल्याने धमकी देण्याचे प्रकारदेखील झाले. याबाबत विविध पुराव्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे झालेल्या अन्यायविरुद्ध तक्रारीदेखील केल्या. मात्र त्यातून काहीही निष्पन्न होत नसून याउलट जीविताला धोका वाढतच चालल्याचे निवेदनात नमूद आहे.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस कर्मचारी मनोज गायकवाड, भोईटे, संपत खबाले, संभाजी कदम यांच्यावर दिलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, सदर मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे मनोज कांबळे यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उपोषण सुरू करण्यात आल्यानंतर यवत पोलिसांनी मनोज कांबळे यांना १४९ प्रमाणे नोटिस बजावली आहे. यात दिलेल्या तक्रारीबाबत कायदेशीर मार्गाने दाद मागून घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी कांबळे यांना जबाबदार धरणार असल्याचे सांगितले आहे. (वार्ताहर)