मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीत गौडबंगाल : विवेक वेलणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:53 PM2019-10-11T19:53:34+5:302019-10-11T20:04:00+5:30
एकाच रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही जमा झालेल्या टोलची रक्कम मात्र जवळपास सारखीच आहे...
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर करण्यात आलेल्या टोलवसुलीमध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. पुर्वीच्या कंत्राटदाराने दिलेल्या आकडेवारीनुसार एका महिन्यात सरासरी ४३ लाख वाहने या मार्गावरून गेली. नवीन कंत्राटदाराच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सुमारे १७ लाख वाहनांचा टोल घेण्यात आला. वाहनांचे आकडे वेगळे असून जमा झालेल्या टोलची रक्कम जवळपास सारखीच असल्याचे निष्पन्न झाल्याचे वेलणकर यांनी सांगितले.
द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट २००४ मध्ये १५ वर्षांसाठी कंत्राटदाराला दिले गेले. त्याची मुदत दि. ९ ऑगस्ट रोजी संपली. त्यानंतर दि. १० ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या कंत्राटदाराला टोलवसुली कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने सप्टेबर महिन्यात जमा झालेल्या टोलची रक्कम व वाहनांची संख्या महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या माहितीनुसार, आधीच्या कंत्राटदाराने एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यात मिळून महामार्गावर १ कोटी ७२ लाख ५० हजार ३९१ वाहने धावल्याचे दाखवले आहे. त्यानुसार सरासरी ४३ लाख वाहने प्रतिमहिना धावली. यामध्ये टोल न भरलेल्या वाहनांचाही समावेश असल्याचे कंत्राटदाराने नमूद केले आहे.
नवीन कंत्राटदाराने सप्टेंबर २०१९ ची आकडेवारी दिली असून त्यामध्ये सप्टेंबर महिन्यात याच रस्त्यावरून १६.९० लाख वाहने धावल्याचे दाखवले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या महिन्यात सुमारे ५९ कोटी रुपयांची टोल वसुली झाल्याचे म्हटले आहे. तर आधीच्या कंत्राटदाराकडूनही प्रतिमहिना सुमारे ६० कोटी रुपयांची टोलवसुली झाल्याचे नमुद केले आहे. एकाच रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही जमा झालेल्या टोलची रक्कम मात्र जवळपास सारखीच आहे. त्यामुळे या टोलवसुलीत गौडबंगाल असल्याचे स्पष्टपणे दिसते, असे वेलणकर यांनी सांगितले. याबाबत तातडीने या आकडेवारीच्या गौडबंगालाची चौकशी करून वस्तुनिष्ठ आकडेवारी प्रसिद्ध करावी, अशी मागणी वेलणकर यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.
----------------