काळा पैसा ‘व्हाईट’ करण्यासाठी फळविक्रेत्याचा केला वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:50+5:302021-03-25T04:12:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उच्च पदस्थ असताना व कायद्याचे सर्व ज्ञान असताना नोकरीच्या काळात जमा केलेला काळा पैसा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उच्च पदस्थ असताना व कायद्याचे सर्व ज्ञान असताना नोकरीच्या काळात जमा केलेला काळा पैसा व्हाईट करण्यासाठी फळविक्रेत्याचा वापर हनुमंत नाझीरकर याने केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. बारामती न्यायालयाने अधिक तपासासाठी नाझीरकर याची ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या परिसरात फसवणूक केलेल्या व उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या अमरावती विभागाच्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याला ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी महाबळेश्वर येथून अटक केली होती. त्याला बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बारामती पोलिसांनी त्याला अटक करुन आज न्यायालयात हजर केले.
याबाबत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. आरोपी हा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आहे. उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आपल्या पदाचा दुरोपयोग करुन नाझीरकर याने काळा पैसा कमविला आहे. हा काळा पैसा व्हाईट करण्यासाठी त्याने अज्ञान फळ विक्रेत्याचा आधार घेतला. त्याच्या बँक खात्यात पैसे टाकून ते फळ विक्रीचे असल्याचे भासवून नंतर ते पैसे आपल्या खात्यात वळते केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीला आपला २०११ पासून २०२० पर्यंत उपयोग करुन घेतला जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याची आवश्यक असल्याने पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.