गॅसची लाईन फुटल्याने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:34 AM2019-01-08T01:34:01+5:302019-01-08T01:34:58+5:30
महाराष्ट्र नॅचरल गॅस : कामादरम्यान लाईन फुटण्याची दुसऱ्यांदा घटना, दुकाने बंद, वीज खंडित
बिबवेवाडी : येथील स्वामी विवेकानंद मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम चालू असून या मार्गावरील शिवरत्न सोसायटीसमोरील जुन्या रस्त्याची खोदाई करण्याचे काम चालू असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस पाइप लाइनला धक्का लागून पाइपलाइन फुटून मोठा आवाज झाला व त्यातून गॅसगळती सुरू झाली.
संध्याकाळी साधारणत: ६.४५ वाजता अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे या परिसरातील नागरिक व रस्त्यावरील वाहतूकदार
यांची धावपळ सुरू झाली व घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच कात्रज अग्निशमन केंद्रातून एक आगीचा बंब व आपत्ती व्यवस्थापनाची देवदूत गाडी घटनास्थळी सर्वात आधी दाखल झाली व तांडेल तळेकर व अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅसची व्यवस्थापनाची गाडी आली. यावेळी स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांनीही घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लाईन फुटण्याची घटना संध्याकाळी झाली यावेळी स्वामी विवेकानंद मार्गावर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक सुरू असते. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी व कुणाच्याही मालमत्तेचे काही नुकसान झाले नाही.
१ महाराष्ट्र नॅचरल गॅस लाईन फुटली त्यावेळी गॅसचा दबाव एवढा प्रचंड होता, की ज्या जेसीबी मशीनने रस्ता खोदाई करण्याचे काम चालू होते त्या मशीनची काचेवर दगड उडून लागल्यामुळे काच फुटली. त्यामुळे या परिसरातील गाळेधारकांनी आपली दुकाने बंद करून वीजप्रवाह बंद केला होता.
२ या मार्गावर रस्ता खोदाई करत असताना गॅस लाईन फुटण्याची ही दुसरी घटना असून, रस्ता खोदाई करत असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लाइनची व्यवस्थापन करणारी गाडी किंवा त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित असावेत, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.