सुक्या कच-याची विल्हेवाट लावण्याची डोकेदुखी
By admin | Published: February 12, 2015 02:33 AM2015-02-12T02:33:42+5:302015-02-12T02:33:42+5:30
फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद झाल्यापासून गेला दीड महिना शहरात दररोज निर्माण होणारा बाराशे
पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद झाल्यापासून गेला दीड महिना शहरात दररोज निर्माण होणारा बाराशे ते तेराशे टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिका प्रशासन पेलत आहे. सध्या सर्व ओला कचरा जिरविण्यात यश येत असले, तरी शिल्लक राहत असलेल्या मोठ्या प्रमाणातील सुक्या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सुका कचरा उचलण्यासाठी कारखानदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.
महापालिकेला फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यास ३१ डिसेंबरची मुदत तेथील ग्रामस्थांनी दिली होती. त्यानुसार १ जानेवारीपासून तिथे कचरा टाकू देणे त्यांनी बंद केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आणखी ९ महिने कचरा टाकू देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. मात्र, त्यापूर्वी काही अटींची पूर्तता करण्यास ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे अजूनही त्यांनी कचरा टाकण्यास मान्यता दिलेली नाही.
कचऱ्याचा प्रश्न भडकणार, हे लक्षात घेऊन प्रशासनाने अगोदरपासून बी प्लॅन तयार ठेवला होता. त्यानुसार कचऱ्याचे जास्तीत जास्त वर्गीकरण करून संपूर्ण ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था केली. शहराच्या जवळपास असणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलून खतनिर्मितीसाठी त्यांना ओला कचरा घेण्यासाठी तयार केले. ज्या शेतकऱ्यांनी यास मान्यता दिली, त्यांच्या शेतात मोठे खड्डे घेऊन त्यामध्ये ओला कचरा टाकला जात आहे. सुक्या कचऱ्यातील काही कचरा पुनर्वापरासाठी दिला जात आहे. तरीही मोठ्या प्रमाणात सुका कचरा शिल्लक राहत आहे. (प्रतिनिधी)