‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:45 AM2018-02-10T11:45:04+5:302018-02-10T11:47:39+5:30

एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

FTII privatization of 'short courses'; Student Association objection | ‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप

‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप

Next
ठळक मुद्देसंस्थेला मनी मेकिंग करण्याचा धंदा बनविले जात आहे : स्टुडंट असोसिएशनकलेच्या शिक्षणावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असता कामा नये : भूपेंद्र कँथोला

पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. खासगी क्लास सुरू करून कलेचे शिक्षण सर्वांसाठी खुले करून दिले जात असेल, तर आम्ही प्रवेश परीक्षा देऊन कशाला इथे प्रवेश घेतला? अशा शब्दांत एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने ‘लघु अभ्यासक्रमां’वरच आक्षेप घेतला आहे. मात्र, कलेचे ज्ञान विशिष्ट लोकांपुरते मर्यादित राहता कामा नये. अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची इच्छा असूनही, संस्थेत शिक्षण घेता येऊ न शकणाऱ्या लोकांच्या दारापर्यंत ‘एफटीआयआय’ पोहोचली आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून संचालकांनी असोसिएशनच्या विधानांनाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
एक काळ असा होता, की संस्थेच्या चार भिंतींच्या आड काय सुरू आहे? ही संस्था काही विशिष्ट लोकांसाठीच आहे, अशी एक धारणा सर्वसामान्यांची होती. संस्थेच्या प्रवेश परीक्षेला देशभरातून ५,००० विद्यार्थी बसत असले तरी प्रत्यक्षात ११० विद्यार्थ्यांची निवड केली जात असल्यामुळे कलेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांचे काय? कलेचे शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतेच सीमित न राहता ते सर्वांना दिले गेले पाहिजे, या उद्देशाने संस्थेच्या प्रशासनाने लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनाच संस्थेमध्ये येणे शक्य नाही; म्हणून एफटीआयआयच्या लोकांच्या दारी पोहोचली आहे. देशातील १४ शहरांमध्ये एफटीआयआयने लघु अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असून, आजपर्यंत २,५०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अमरावतीमध्येही अभ्यासक्रम सुरू झाला आहे. हा लघु अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून, नेपाळमधील २० कलाकारांचा ग्रुप २० दिवसांच्या लघु अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असल्याचे कँथोला यांनी स्पष्ट केले. पण दुसरीकडे, एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने पैसा कमावण्याच्या उद्देशाने संस्थेकडून लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा घाट घातला आहे. या अभ्यासक्रमांसाठी १० ते २० हजारांपर्यंतचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे संस्थेचे लक्ष्य हटले आहे. या संस्थेला मनी मेकिंग करण्याचा धंदा बनविले जात असल्याची टीका असोसिएशनने केली आहे. 

कलेच्या शिक्षणावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असता कामा नये. याकरिता लघु अभ्यासक्रमांच्या माध्यमातून हे शिक्षण सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून दिले आहे. यातून चित्रसाक्षरता वाढीस लागत आहे. 
- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

Web Title: FTII privatization of 'short courses'; Student Association objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.