FTII: 'तो मेडिटेशनही करायचा...' आत्महत्या केलेल्या अश्विन शुक्लाच्या सहकाऱ्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:49 PM2022-08-05T17:49:21+5:302022-08-05T17:50:02+5:30
आम्हाला सर्वांनाच धक्का बसलाय...
पुणे : अश्विनचा खांदा निखळल्याने त्याला थोडा त्रास व्हायचा. त्यासाठी तो मेडिटेशन करायचा. औषधाने त्याला झोप लागायची. त्यामुळे त्याला फारसे कुणी डिस्टर्ब करायचे नाही. पण तो असे काही करेल असे
कुणालाच वाटले नाही. आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे, असे एफटीआयआयमधील आत्महत्या केलेल्या अश्विन शुक्लाच्या सहकारी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अश्विन सिनेमँटोग्राफीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. डिप्लोमाची तो तयारी करीत होता. त्याचे कॅमेऱ्याचे तांत्रिक ज्ञान जबरदस्त होते. त्याचं वाचन उत्तम होते. एकटाच अनेकवेळा रूमवर वाचन करीत बसायचा. एकदम चांगला व्यक्ती होता. त्याचे कुणाशी कधी वाद नव्हते. दोन आठवड्यांपूर्वी मास्टर क्लास झाला. त्यात तो सहभागी झाला होता. 29 जुलैला शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे थेअरी शिक्षण संंपले. आता आमचे सप्टेंबरमध्ये डिप्लोमा सुरु होणार आहेत. त्याच्या बैठका सुरु होत्या. अश्विनचे डिप्लोमासाठी नियोजन सुरु होते...हे सांगताना त्याचा सहकारी भावूक झाला होता. एका मित्राने अश्विनच्या रूमची कडी ठोठावली होती. पण त्याने दरवाजा उघडला नसल्याचे तो म्हणाला.
दोन दिवसांपूर्वी व्हिसडमट्री येथे रात्री झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण भेटले होते. त्या पार्टीलाही तो उपस्थित होता. त्याने आत्महत्या केल्याचे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याला नैराश्य आले असल्याची कोणतीच लक्षणे त्याच्यात दिसत नव्हती. असं काय घडल की त्याने हे पाऊल उचलले ते कळेनासे झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर त्याचे पार्थिव ससूनला शवविच्छेदनासाठी नेले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये कारण समजू शकेल.- सईद रब्बीहाश्मी, कुलसचिव, एफटीआयआय