प्लॅस्टिकमधून होणार इंधननिर्मिती : पुणे पालिकेचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:40 PM2019-08-17T12:40:34+5:302019-08-17T12:44:37+5:30
प्लॅस्टिक कचऱ्यामधून इंधननिर्मिती प्रकल्पातून सुमारे दीड हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागेल.
पुणे : प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यामधून इंधननिर्मिती केली जाईल. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोरील कचरा रॅम्पवर चार मेट्रिक टनांचा प्रकल्प उभारण्यात येत असून तो सीएसआर फंडामधून उभा केला जाणार आहे. यातील एका प्रकल्पावर दिवसाला १,६०० ते १,७०० लिटर इंधननिर्मिती होणार असून वर्षाकाठी साधारणपणे १,४६० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल.
प्लॅस्टिक कचºयाचे विघटन होत नसल्याने होणारी पर्यावरणीय हानी मोठी आहे. या कचऱ्याचा पुनर्वापर करून त्यापासून इंधननिर्मिती करण्यासाठी पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एक मेट्रिक टनाचा प्रकल्प घोले रस्त्यावर उभारला होता. आता या ठिकाणी प्रतिदिन चार मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उभारला जात आहे. खासगी कंपनी या प्रकल्पासाठी गुंतवणूक करणार असून पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. या प्रकल्पातून डिझेल, पेट्रोल, क्रूड ऑईलची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रकल्पासाठी पालिका जागा, विद्युत आणि पाण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. विजेचे बील कंपनीच भरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी गुंतवणूक करावी लागणार असून पालिकेला वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
.......
प्लॅस्टिकचे गट्टू : वापरून इंधननिर्मिती होते
घोले रस्त्यावर प्रतिदिन एक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधननिर्मिती करण्यासाठीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आला होता. पालिकेने या प्रकल्पासाठी गॅसिफायर, इन्सिनरेटर खरेदी केले होते.
प्रशिक्षित मनुष्यबळासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या ठिकाणी प्लॅस्टिकचे गट्टू तयार करून पिरंगुट येथील एका कंपनीमध्ये नेले जात होते. तेथे या गट्टूंचा वापर करून इंधननिर्मिती केली जाते. या कंपनीचे मालक प्लॅस्टिकमधून तयार झालेले पेट्रोल स्वत:च्या गाडीसाठी वापरतात.
........
प्लॅस्टिक कचऱ्यामधून इंधननिर्मिती प्रकल्पातून सुमारे दीड हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागेल. यासोबतच कोरेगाव पार्क येथेही चार मेट्रिक टनांचा प्रकल्प उभारला जाणार असून तो येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्पही सीएसआरमधून केला जाईल. या ठिकाणी प्लॅस्टिकमधून पेट्रोल, डिझेल आणि क्रूड तेलाची निर्मिती केली जाणार आहे.
- ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग
.....