इंधन विक्री होतीये, मात्र पैसे कुठे जाताहेत! पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला २ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:20 IST2025-04-05T13:20:17+5:302025-04-05T13:20:28+5:30

मालकाने पंपाचे ऑडिटर मार्फत ऑडिट करून घेतल्यावर पैसे मॅनेजर आपल्या स्वतःच्या बँक खात्यात घेत असल्याचे निदर्शनास आले

Fuel is being sold but where is the money going Petrol pump manager cheats owner of Rs 2 crore | इंधन विक्री होतीये, मात्र पैसे कुठे जाताहेत! पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला २ कोटींचा गंडा

इंधन विक्री होतीये, मात्र पैसे कुठे जाताहेत! पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला २ कोटींचा गंडा

पुणे: पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एकाने मालकाला २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. नफा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मालकाने ऑडिट केले, त्यावेळी अपहार आणि फसवणुकीचा हा प्रकार उजेडात आला.

या प्रकरणी अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मॅनेजर नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते मार्च २०२४ या कालावधीत ॲटोकॉर्नर पेट्रोल पंप, कुंजीरवाडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांचा कुंजीरवाडी येथे ॲटोकॉर्नर नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर आरोपी रायपुरे हा मॅनेजर म्हणून काम करतो. पूर्वी हा पंप काळे यांचे वडील पाहत होते. रायपुरे हा मागील पंधरा वर्षांपासून त्यांच्या पंपावर मॅनेजर म्हणून काम करतो. काळे यांच्या वडिलांचे आणखीन व्यवसाय असल्यामुळे तो पंप रायपुरेच्याच हातात होता. शिवाय काळे यांच्या वडिलांचा त्याच्यावर खूप विश्वास. दरम्यान, काळे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंपाचा कारभार त्यांच्याकडे आला. पंपावरून इंधनाची विक्री तर होतेय, मात्र पैसे कोठे जातात हे समजत नव्हते. त्यामुळे काळे यांनी पंपाचे ऑडिटर मार्फत ऑडिट करून घेतले. त्यावेळी पंपावरून इंधन विक्री केलेले पैसे रायपुरे हा आपल्या स्वतःच्या बँक खात्यात घेत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी मॅनेजर रायपुरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करत आहेत.

Web Title: Fuel is being sold but where is the money going Petrol pump manager cheats owner of Rs 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.