इंधन दरवाढीमुळे एसटीला फटका : कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:39+5:302021-08-15T04:12:39+5:30

( रविकिरण सासवडे) बारामती : कोरोनामुळे प्रवासी नसल्याने एसटीचे चाक तोट्यामध्ये रुतले असतानाच इंधन दरवाढीचा राज्य परिवहन ...

Fuel price hike hits ST: Forced leave to employees | इंधन दरवाढीमुळे एसटीला फटका : कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

इंधन दरवाढीमुळे एसटीला फटका : कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

Next

( रविकिरण सासवडे)

बारामती : कोरोनामुळे प्रवासी नसल्याने एसटीचे चाक तोट्यामध्ये रुतले असतानाच इंधन दरवाढीचा राज्य परिवहन महामंडळाला फटका बसला आहे. डिझेलअभावी राज्यातील अनेक आगारांमध्ये एसटीबस जागेवर उभ्या आहेत. तर इंधनाअभावी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास प्रशासनाला कर्मचाऱ्यांना ड्यूटी देता येत नाही. परिणामी, बारामती आगारामध्ये चालक-वाहकांकडून रजेचे अर्ज भरून घेत असल्याचा अजब प्रकार देखील समोर आला आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोना परिस्थितीमुळे एसटी बसमधील प्रवासीसंख्या रोडावली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर, राज्य परिवहन महामंडळाने सुरक्षित प्रवासी वाहतुकच्या सूचना विभागांना दिल्या होत्या. मात्र, इंधन दरवाढीमुळे अनेक एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बारामती आगारातंर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने चोरट्या प्रवासी वाहतुकीला देखील उत आला आहे.

बारामती आगाराने खडकी, रावणगाव, नांदादेवी, बरड, निंबोडी, शिर्सुफळ, शिवपुरी, आसू आदी ग्रामीण भागातील मुक्कामी गाड्या व फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या आहेत, तर शटलसेवा असणाऱ्या जेजुरी, वालचंदनगर, भिगवण, इंदापूर, नीरा आदी मार्गांवरील फेऱ्या कमी केल्या आहेत. या मार्गावर जाणाऱ्या बसच्या फेऱ्यांमधील अंतर दोन तासांहून अधिक असल्याने चोरटी प्रवासी वाहतूक मोठ्याप्रमाणात होते. परिणामी, एसटीला प्रवासी मिळत नाहीत.

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेने बारामती आगाराकडे चालक-वाहकाला ड्यूटी न मिळाल्यास कामगार कायद्याप्रमाणे हजेरी मिळावी, असे पत्र दिले आहे. या पत्रानुसार, बारामती आगारातील चालक-वाहकांना लोकेशन लावत असताना ज्या कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावली जात नाही, अशा चालक-वाहकांना नाईलाजास्तव स्वत:च्या खात्यातील अर्जित रजा खर्च कराव्या लागत आहेत. एसटी प्रशासनाने चालक-वाहकांना ड्यूटी लावावी. अन्यथा, संबंधित कर्मचाऱ्यांना कामगार करार कायद्यानुसार हजेरी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. सध्या बारामती आगारामध्ये डिझेलअभावी बऱ्याच चालक-वाहकांची ड्यूटी रद्द होते. चालक-वाहकांना संध्याकाळपर्यंत आगारात थांबावे लागते. अशा चालक-वाहकांना त्या दिवसाची हजेरी देण्यात यावी. मात्र, चालक-वाहकांकडून जबरदस्तीने हक्काच्या रजेचे अर्ज भरून घेतले जातात. ही बाब कामगार कायद्याचा भंग करणारी आहे. तसेच, कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारी आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

----------------------

कोरोनाकाळातील पगार नाही

सन २०२० ऑक्टोबर, नोव्हेंबर या काळातील लॉकडाऊन हजेरीचा पगार बारामती आगारातील कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. यासंदर्भात कामगार अधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा झाली, तसेच सदरच्या महिन्याचे अ‍ॉडिट करूनसुध्दा कर्मचाऱ्यांना त्या महिन्याचे थकीत वेतन अद्याप मिळालेले नाही. हे वेतन देखील लवकर देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-------------------------

प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. ड्यूटी न मिळाल्याचे कारण अर्जात नमूद केल्यास तो अर्ज घरगुती कामाकरिता असा द्या, असे सांगितले जाते. बऱ्याच वेळा डिझेलचा नियमित पुरवठा न झाल्यानेही काही कामगारांच्या ड्यूटी रद्द केल्या जातात. अशा वेळीही त्या कामगारांना हजेरी भरून देणे क्रमप्राप्त असताना त्यांच्याकडून रजेचे अर्ज मागितले जातात. काही कामगारांचे आठवड्यात सहाच्या सहा दिवस भरले जातात. असाही दुजाभाव बारामती आगारामध्ये सुरू आहे. यासंदर्भात, आम्ही प्रशासनाला पत्र दिले आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांना काम न मिळालेल्या दिवसांची हजेरी भरून न दिल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार आहोत. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.

- बाळासाहेब गावडे

सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, पुणे विभाग

-------------------------------

बारामती आगारामध्ये डिझेलचा तुटवडा नाही. डिझेलची उपलब्धता पाहून गाड्यांचे नियोजन करतो. ज्या दिवशी डिझेल मिळणार नसेल त्या दिवशीच्या काही गाड्या रद्द करण्यात येतात. सध्या डिझेलचा पुरवठा कामकाज सुरू राहण्या इतपत होत आहे. मात्र, त्यामुळे आम्हाला एवढी काही अडचण आली नाही. डिझेलच्या पुरवठ्यावर गाड्यांचे नियोजन केले जाते. आणि संबंधित चालक-वाहकांची ड्यूटी लावली जाते. कोणाकडूनही रजेचे अर्ज मागवले जात नाहीत. ड्यूटीच लावली नाही तर रजेचे अर्ज प्रशासन कशासाठी मागवेल ?

- अमोल गोंजारी

आगारप्रमुख, बारामती आगार

-------------------------

फोटो ओळी : इंधनाअभावी बारामती आगारामध्ये उभ्या असणाऱ्या एसटी बस.

१४०८२०२१-बारामती-०१

------------------------------

Web Title: Fuel price hike hits ST: Forced leave to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.