इंधन दरवाढ वाहन आयुमर्यादा : वाहतूकदारांमध्ये वाढता रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:19+5:302021-02-10T04:11:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्व आरटीओंमध्ये (प्रादेशिक परिवहन कार्यालय) मंगळवारी दुपारी रिक्षा, बस, टॅक्सी, मालमोटार चालक-मालकांच्या वतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सर्व आरटीओंमध्ये (प्रादेशिक परिवहन कार्यालय) मंगळवारी दुपारी रिक्षा, बस, टॅक्सी, मालमोटार चालक-मालकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेलचा वाढता दर व केंद्र सरकारने वाहनांवर घातलेले आयुमर्यादेचे बंधन याचा निषेध करत सर्व ठिकाणी निवेदन देण्यात आले. इंधनदर आटोक्यात आणा व आयुमर्यादेचे बंधन रद्द करा, अशी मागणी केली आहे.
पुण्यातही आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी सर्वांनी एकत्र येत आंदोलन केले. वाहन प्रशिक्षण केंद्र चालकही यात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने खासगी दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने यांच्यावर ते खरेदी केल्यापासून १५ वर्षांच्या आयुमर्यादेचे बंधन घातले आहे. त्यानंतर वार्षिक जादा कर देऊन फक्त ५ वर्षांची मुदत मिळेल व त्यानंतर वाहन स्क्रॅप करावे लागेल असा हा नियम आहे. राज्य मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले, की वाहन उद्योजकांच्या दबावातून हा निर्णय घेतला आहे. यातून देशाच्या ग्रामीण भागातील वाहतूक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्यातील अशा सर्व वाहतूकदारांनी एकत्रित येत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एकाच वेळी सर्व आरटीओ कार्यालयात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या वतीने निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनाही या निवेदनाची प्रत दिली. त्यात वाढते इंधन दर तत्काळ आटोक्यात आणावेत, ते स्थिर ठेवावेत तसेच वाहनांची आयुमर्यादा रद्द करावी, अशा मागण्या केल्या आहेत. विक्रांत विरूळकर, प्रकाश जगताप, नीलेश ढवळे, राजू पाटोळे, दादा कुंभार, चंद्रकांत हरपळे यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने यावर योग्य निर्णय त्वरित घेतला नाही तर १३ फेब्रुवारीला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली यांच्या वतीने देशभरात चक्का जाम करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा दिला.