एक किलो मटार, शेवगा शेंगेच्या पैशांत मिळते दोन लिटर पेट्रोल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 11:05 AM2021-11-18T11:05:57+5:302021-11-18T11:08:07+5:30
गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस पडत असल्याने पुणे जिल्ह्यातील जवळपासचा भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातून आयात करावा लागत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले
अभिजित कोळपे
पुणे: सध्या मटार आणि शेवग्याचे दर गगनाला भिडले आहेत. पुणे शहरात एक किलो मटार आणि शेवग्याच्या भावात दोन लीटर पेट्रोल मिळेल एवढे दर वाढले आहेत. त्यामुळे आता यापुढे मटार, शेवगा खायचा की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. किरकोळ बाजारात मटारची २२० रुपये किलो, तर शेवग्याची जवळपास २०० किलोपर्यंत विक्री होत आहे.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. कोबी, फ्लॉवर, गाजर आणि वांगी आदी पुणे परिसरातूनच येत असल्याने त्याचे दर आवाक्यात आहेत. याउलट मटार, शेवगा, पावटा, गवार, घेवडा, दोडका, ढोबळी मिरची, भेंडी आदी भाजीपाला अन्य जिल्ह्यातून येत आहे. त्याचा वाहतूक खर्च वाढल्याने त्या महागल्याचे व्यापारी सांगतात.
भाजीपाला का महागला ?
मागील सहा-आठ महिन्यांत इंधनाची मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मालभाड्याच्या वाहतूक खर्चात वाढ करण्यात आली आहे. त्याच्या परिणामामुळे भाजीपाला महाग झाला आहे. गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस पडत असल्याने पुणे जिल्ह्यातील जवळपासचा भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातून आयात करावा लागत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
एकीकडे कोरोना महामारीमुळे आधीच बेजार झालो आहोत. तर दुसरीकडे गेल्या सहा-आठ महिन्यांपासून सातत्याने तेल, साखर, शेंगदाण्याचे दर वाढत आहेत. त्यात आता भाजीपाला महाग होत आहे. मटार, शेवग्याचे वाढलेले दर पाहता ते खाणे नाईलाजाने करावे बंदलागत आहे.
सुमन कदम, गृहिणी
भाजीपाला | मार्केटयार्डातीलदर | किरकोळबाजारातील दर |
मटार | 160-180 | 200-220 |
शेवगा | 120-140 | 180-200 |
पावटा | 50-60 | 80-100 |
गवार | 40-60 | 70-90 |
भेंडी | 30-40 | 60-80 |
घेवडा | 45-50 | 60-80 |
दोडका | 30-40 | 50-70 |
ढोबळी मिरची | 25-40 | 50-70 |
टोमॅटो | 25-30 | 40-60 |
वांगी | 25-30 | 40-50 |
गाजर | 25-50 | 40-70 |