फरार आरोपी शिक्रापूर येथे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:13 AM2021-09-06T04:13:00+5:302021-09-06T04:13:00+5:30
परभणी येथील एका इसमाची दहा एकर जमीन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने कब्जात घेऊन जमीन नावावर करण्यासाठी मनोज पंडित याने ...
परभणी येथील एका इसमाची दहा एकर जमीन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने कब्जात घेऊन जमीन नावावर करण्यासाठी मनोज पंडित याने जमीनमालक व्यक्तीला ऑडिओ क्लिप प्रसारित करून बदनामी करू, महिला विनयभंग, बलात्कार खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत सदर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना परभणी पोलिसांनी आरोपी टोळीवर कडक कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये, मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. आरोपी मनोज पंडित हा फरार झालेला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो वारंवार पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी हा परभणी येथून फरार होऊन पुणे जिल्ह्यात शिक्रापूर परिसरात आला. तो राहण्यासाठी खोली शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस शिपाई अक्षय जावळे, दगडू वीरकर यांनी शिक्रापूर परिसरात सापळा लावत मनोज भगवान पंडित (वय २४ वर्षे, रा. वांगी रोड परभणी) याला जेरबंद केले असून, त्याला परभणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे परभणी जिल्ह्यातील मोक्कातील फरार आरोपीला जेरबंद करणारे पोलीस पथक व आरोपी. (धनंजय गावडे)