बाळा दराडे टोळीतील फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:01+5:302021-05-30T04:09:01+5:30
बारामती : येथील बाळा दराडे टोळीतील तसेच खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह मोक्का गुन्ह्यातील सुमारे ६ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला ...
बारामती : येथील बाळा दराडे टोळीतील तसेच खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह मोक्का गुन्ह्यातील सुमारे ६ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला बारामती येथे पकडण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला जेरबंद केले. शुभम ओमप्रकाश खराडे (रा. शेटफळगडे, ता. इंदापूर) असे त्याचे नाव आहे.
दरम्यान, शुभम खराडे हा गुंड बाळा दराडे टोळीतील सक्रिय सदस्य व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याचेवर यापूर्वी बारामती तालुका व भिगवण पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी, खंडणी, गंभीर दुखापत, मारामारी असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे ३० नोव्हेंबर २०२० रोजी बाळा पोपट दराडे ,विजय बाळू गोफणे, शुभम ओमप्रकाश खराडे व इतर २ अनोळखी आरोपींनी संजय तुकाराम थोरवे (रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना लोखंडी रॉडने व गजाने मारहाण करत घड्याळ व रोख रक्कम काढून घेतली होती. बारामती शहर, बारामती तालुका व भिगवण या पोलीस स्टेशनला दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचे कारणावरून ही मारहाण केली तसेच थोरवे यांची पत्नी योगिता हिचा गळा दाबून तिच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. थोरवे यांच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणी दराडे, गोफणे यांना यापूर्वी बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे. परंतु शुभम खराडे हा फरार होता.
शुक्रवारी (दि.२८) मोक्का गुन्ह्यातील खराडे हा पेन्सिल चौक बारामती येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला दीड किलोमीटर पाठलाग करून पकडले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांनी ही कारवाई केली.
बारामती येथील गुंड बाळा दराडे टोळीतील फरारी असलेल्या शुभम खराडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
२९०५२०२१ बारामती—०२