पुणे | कावळपिंपरीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला गुजरातमधून केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:27 PM2022-11-14T20:27:26+5:302022-11-14T20:30:02+5:30
आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली...
नारायणगाव (पुणे) : कावळपिंपरी (ता. जुन्नर) येथे जमीन आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुजरात राज्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. दरम्यान, जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे.
मन्ना उर्फ सूरज हर्जित सिंग (वय २३) (रा. हरदोचक बांम्बा, मंदिर म्हाथ्रा भागी तर्न, तरण राज्य पंजाब) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कावळपिंपरी येथील रोहिदास बाबूराव पाबळे याची जमिनीच्या आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्या राहत्या घराचे पाठीमागे कोयते, तलवारी तसेच अग्निशस्त्र यांच्या साहाय्याने मन्ना सिंग याने निर्घृण हत्या केली होती.
नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी मन्ना सिंग (मूळ रा. पंजाब) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक अशोक शेळके, साहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सानील धनवे, पोलिस हवालदार विक्रम तापकिर पो. काॅ. वैद्य, केंद्रे, पोलिस मित्र अक्षय ढोबळे या पथकाने फरार आरोपी मन्ना सिंग हा गुजरात राज्यात वेशांतर करून वावरत आहे व तो तेथील एका कंपनीत कामाला जात आहे, अशी माहिती मिळाली. तपास पथकाने मन्ना सिंग यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने रोहिदास पाबळे याचा धारदार शस्त्राने व अग्निशस्त्र (पिस्टल) यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.