CID ची पुण्यात कारवाई, तीन वर्षांपासून फरार असलेल्या ॲड. सागर सूर्यवंशीला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 08:16 PM2021-10-09T20:16:13+5:302021-10-09T20:19:32+5:30
सीआयडीने ॲड.सूर्यवंशी याला शुक्रवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी अटक केली
पुणे: अनेक नामावंतांना धमकावून त्यांची फसवणूक करणार्या व पुणे जिल्हा न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आलेल्या ॲड. सागर सूर्यवंशी याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका मंदिराच्या आवारातून ताब्यात घेतले. ॲड. सागर मारुती सूर्यवंशी याच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर, पिंपरी, भोसरी एमआयडीसी तसेच नवघर पोलीस ठाण्यात मिळून एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या ३ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
अटक पूर्व जामिनासाठी त्याने थेट सर्वेाच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केला होता. तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला होता. त्याला पोलिसांकडे हजर राहण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. तरीही तो हजर राहिला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली. जिल्हा न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते. तसेच, उच्च न्यायालयाने गेल्या ३ वर्षापासून फरार असलेला अॅड. सूर्यवंशीला का अटक होत नाही अशी विचारणा देखील सीआयडीकडे केली होती. त्यानंतर सीआयडीच्या पथकाने याबाबत गांभीर्याने दखल घेत सूर्यवंशी याचा तपास सुरु केला होता. त्यासाठी दोन विशेष पथकांची स्थापना केली होती.
सूर्यवंशी हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील रेणुका मातेचा भक्त असल्याने तो नवरात्रीमुळे शुक्रवारी रात्री दहा वाजता मंदिरात येणार असल्याची माहिती सीआयडीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करुन सापळा रचला. तो दर्शनासाठी येताच त्याला अटक केली. सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पथक तपास करीत आहेत.
सूर्यवंशी ससूनमध्ये ॲडमिट
सीआयडीने ॲड.सूर्यवंशी याला शुक्रवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी अटक केली. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्याच्या तक्रारीनुसार डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेतले आहे. तसे न्यायालयाला कळविण्यात आले असल्याचे सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले