मोक्का कारवाईतील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या, दोघांवर तब्ब्ल ८० गुन्हे दाखल झाल्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 03:53 PM2021-04-14T15:53:52+5:302021-04-14T15:54:40+5:30
अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त
हडपसर: औंध पोलिसांना धमकावून पळून जाणाऱ्या मोक्का कारवाईतील फरारी आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १८ लाख १७ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या २४ तासांत हडपसर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सनिसिंग पापासिंग दुधानी (वय २२, रा. हडपसर) आणि सोहेल जावेद शेख (वय 21, रा. हडपसर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
हडपसर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सौरभ माने व पोलीस अंमलदार हे १३ एप्रिलला रात्री अडीचच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी पोलीस शिपाई नाईक समीर पांडुळे आणि प्रशांत टोणे यांना दुधानी आणि शेख दोन्ही यांना आरोपी बिराजदारनगर येथील कालव्याजवळ फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरून जाताना दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने पाठलाग करून दोघांना पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी हडपसर, कोरेगाव पार्क, भोसरी, चाकण, कोंढवा आदी परिसरामध्ये घरफोडी, वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चार घरफोड्या, चार चारचाकी कार, तीन दुचाकी असे १२ गुन्हे केल्याचे तपासात कबुल केले. आरोपीकडून अधिक गुन्हे उघड येण्याची शक्यता असून, त्यांच्या साथीदारांचा पोलीस तपास करत आहेत.
सनिसिंग पापासिंग दुधानी याच्यावर ६८ गुन्हे, तर सोहेल जावेद शेख याच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत. दोघेही मोक्कातील आरोपी असून, औंध पोलिसांना धमकावून फरार झाले होते. वाहनचोरी करून त्या वाहनांचा वापर घरफोडीसाठी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. आरोपीचे साथीदारांचा तपास सुरू असून आणखी गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येतील, असे पोलिसांनी सांगितले.