महापालिकेच्या सेवांचे संपूर्ण संगणकीकरण
By admin | Published: May 12, 2017 05:33 AM2017-05-12T05:33:48+5:302017-05-12T05:33:48+5:30
महापालिकेच्या सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा संकल्प अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ४५ कोटी २४ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा संकल्प अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ४५ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार असून त्यामधून सेवा सुलभ करणारे विविध प्रकारचे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित होणे अपेक्षित आहे.
विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांना द्यावयाचा मोबदला ‘थेट लाभ हस्तांतर’ धोरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाद्वारे थेट त्याच्या बॅँक खात्यात जमा करण्याकरिता संगणकप्रणाली विकसित करण्यात येणार आहे. विविध विभागांचे डॅशबोर्ड विकसित करणे, उपलब्ध संगणकप्रणाली मधील माहितीचे कामनिहाय विश्लेषण करणारे अॅप्लिकेशनही विकसित करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या कॅशलेस इकॉनॉमी या योजनेला प्रतिसाद म्हणून महापालिकेचा करभरणा तसेच विविध प्रकारच्या दाखल्यांचे शुल्क वगैरे सर्व प्रकार कॅशलेस करण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्राथमिक सुविधा तयार करण्यावर आगामी वर्षात भर देण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांना संगणकसाक्षर करण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करणे, तिथे प्रशिक्षण देणारी व्यवस्था तयार करणे, महापालिकेच्या विविध उपक्रमांचे तंत्रज्ञानाचा वापर करून ब्रॅडिंग करणे या गोष्टी करण्यात येणार आहेत.