छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार
By राजू हिंगे | Published: December 31, 2023 04:37 PM2023-12-31T16:37:07+5:302023-12-31T16:38:00+5:30
ब्रांझ मधील पुतळयाची उंची १० ते १२ फुट आणि पुतळयाचे वजन तीन हजार ते साडेतीन हजार किलो आहे
पुणे : लोहगांव परिसरातील भक्ती शक्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार आहे. अखिल शिवजयंती उत्सव लोहगाव या संस्थेमार्फत याचे सगळे काम केले जाणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शिल्प अखिल शिवजयंती उत्सव लोहगाव या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. लोहगाव येथील बस स्टॉप चौकामध्ये हे शिल्प बसविण्यात येणार आहे. तसेच पुतळ्याची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती संबंधित संस्था करणार आहे. या शिल्पाचे काम शिल्पकार अजिंक्य कुलकर्णी यांचेकडून डोणजे पुणे येथे तयार करण्यात येणार आहे. आमदार सुनिल टिंगरे यांनी याबाबतची मागणी केली होती. ब्रांझ मधील पुतळयाची उंची १० ते १२ फुट आणि पुतळयाचे वजन तीन हजार ते साडेतीन हजार किलो आहे. या पुतळ्याचा बेस ९ फुट व रुंदी ७ फुट असणार आहे, असे प्रस्तावात नमुद केले आहे.