‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलना’च्या माध्यमातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:47 PM2018-01-25T12:47:27+5:302018-01-25T12:53:03+5:30
यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सी. एस. आर. असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. संमेलन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.
पुणे : एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लेखक, कवी व निमंत्रित यांचे मानधन, पंचतारांकित सुविधा व जाण्या-येण्याचा खर्च याची खमंग चर्चा होत असताना एका साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मात्र गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ असे त्याचे नाव आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सी. एस. आर. असा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.
पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय साधणारे विविध उपक्रम यावर चर्चा, परिसंवाद अनुभवकथन असे याचे स्वरूप आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पुणे हे करणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गिरिप्रेमी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे, काशी पंचक्रोशी परिक्रमा संघाचे अध्यक्ष पंडित विश्वनाथशास्त्री पाळंदे, भारती ठाकूर, उष:प्रभा पागे, श्रीहरेकाका, ब्रह्मा रेड्डी, पिंपरी चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, रवींद्र गुर्जर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारती ठाकूर या सुप्रसिद्ध लेखिकेने मंडलेश्वरजवळ लेपा गावामध्ये ‘नर्मदालय’ ही निवासी शाळा आणि कौशल्य शिक्षण प्रदान करणारे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
साहित्य संमेलनातून सी. एस. आर. असा हा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनामधून सामाजिक उपक्रमासाठी भरघोस निधी दिला जाणार आहे.