मेट्रोच्या कामाला निधीचे इंधन
By admin | Published: March 20, 2017 04:20 AM2017-03-20T04:20:55+5:302017-03-20T04:20:55+5:30
पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी
पुणे : पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १३० कोटी रुपये पुण्यासाठी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे, मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी सरकारने महामेट्रो ही कंपनी स्थापन केली आहे. अंदाजपत्रकात निधीची तरतूद करताना राज्य सरकारने या तीन व भविष्यात अन्य शहरांमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी म्हणून एकत्रितपणे ७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पुण्याच्या वाट्याला किती पैसे येणार, हे स्पष्ट होत नसले तरी साधारण १३० कोटी रुपये मिळतील, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अंदाजपत्रकात फक्त उल्लेख असून, केंद्र सरकार पुरस्कृत ९९० कोटी २६ लाख रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या वर्षासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यासाठी या तरतुदी स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले. अंदाजपत्रक पुण्यासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य सरकारने १ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)