पालिकेत निधीची लयलूट
By Admin | Published: January 23, 2016 02:40 AM2016-01-23T02:40:19+5:302016-01-23T02:40:19+5:30
सर्वसाधारण सभेतील निर्णयांनाही कशी स्वार्थाची झालर असते, याचे प्रत्यंतर महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आज पुणेकरांना दिले.
पुणे : सर्वसाधारण सभेतील निर्णयांनाही कशी स्वार्थाची झालर असते, याचे प्रत्यंतर महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आज पुणेकरांना दिले. कृषी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एका खासगी संस्थेला विनाचर्चा तब्बल ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले, तर पुण्याची ओळख असणाऱ्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाला १ लाख रुपये देण्याचा विषय लांबणीवर टाकण्यात आला.
मीडिया रूटस् या संस्थेच्या वतीने कृषी सन्मान पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील कर्तृत्वनान शेतकरी तसेच शेतीविषयक काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला मदत म्हणून पालिकेने ५ लाख रुपयांची देणगी द्यावी, असा विषय सभागृहनेते बंडू केमसे व शारदा ओरसे यांनी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. एका शब्दाचीही चर्चा न होता या विषयाला मंजुरी देण्यात आली. वास्तविक कोणत्याही संस्थेला पालिकेच्या वतीने ३ लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी देऊ नये, असा सर्वसाधारण सभेचाच ठराव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा देणग्या देण्यावर राज्य सरकारनेही अनेक निर्बंध टाकले आहेत. त्या सगळ्या नियम, संकेत, कायद्याला धाब्यावर बसवत कसलीही चर्चा न करता मीडिया रूटस् या संस्थेला तब्बल ५ लाख रुपये देण्याचा विषय मंजूर झाला. भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर, अशोक येनपुरे, अंदाजपत्रकातील रक्कम आहे, पुढच्या सभेपर्यंत विषय नेऊ नका, द्या मंजुरी अशी विनंती करीत होते, मात्र शिंदे यांनी ती मान्य केली नाही. मीडिया रूटस् या संस्थेला ५ लाख रुपये देण्याचा विषय ज्याचा होता, त्या सभागृहनेते केमसे यांनीही केळकर संग्रहालयाच्या देणगीचा विषय एक महिना पुढे नेण्यास संमती दिली. (प्रतिनिधी)