टास्क अन् ट्रेडिंगचा फंडा; पुण्यात दोघींना साडेनऊ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: May 16, 2024 03:55 PM2024-05-16T15:55:16+5:302024-05-16T15:56:37+5:30
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिला डॉक्टरची ७ लाख ८४ हजारांची फसवणूक केली आहे...
पुणे : शेअर मार्केट आणि पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची ९ लाख ६७ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिला डॉक्टरची ७ लाख ८४ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेला व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या मोबाईल मध्ये एक ऍप डाउनलोड करायला लावून त्यात ७ लाख ८४ हजार गुंतवायला भाग पाडले. यानंतर फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली असता जमा असलेल्या रक्कमेच्या २० टक्के रक्कम भरायला सांगत फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक झिने करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची १ लाख ८३ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाघोली येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ४ ते ९ एप्रिल दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेला पार्ट टाइम नोकरी असल्याचे सांगून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. यानंतर महिलेला ३ हजार रुपये गुंतवण्यास सांगून ४ हजार ८०० रुपये परतावा देऊन विश्वास संपादन केला. यानंतर विविध बँक खात्यावर १ लाख ८३ हजार पाठवायला सांगून फिर्यादी महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.