शिवनेरीच्या संवर्धनासाठी २३ कोटी ७० लाखांचा निधी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:15 AM2021-02-18T04:15:54+5:302021-02-18T04:15:54+5:30
जुन्नर : गतवर्षी शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शिवनेरीच्या संवर्धनासाठी २३ कोटी ७० लाखांचा ...
जुन्नर : गतवर्षी शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शिवनेरीच्या संवर्धनासाठी २३ कोटी ७० लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, शिवजयंती उत्सवानिमित देण्यात येणारा मानाचा छत्रपती शिवनेरीभूषण पुरस्कार यंदा जागतिक स्तरावरील सर्पदंशतज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यानिमित साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती आमदार बेनके यांनी जुन्नर येथे दिली. यावेळी पंचायत समिती सभापती विशाल तांबे, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक भाऊसो कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष धनराज खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी तसेच शिवजयंतीनिमित्ताने किल्ले शिवनेरीवर शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांच्या संख्येवर निर्बंध शासनाने जाहीर केले असून या संदर्भात बोलताना आमदार बेनके म्हणाले की , जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या नियोजनतून सुवर्णमध्य काढण्यात येईल. प्रशासनाचे निर्देश पाळताना शिवभक्तांचा उत्साह कमी होणार नाही यासंदर्भात नियोजन केले जाईल. दरम्यान , कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने शिवभक्तांनी गर्दी टाळून शिवजयंती उत्सव उत्साहात, परंतु साधेपणात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवनेरी संवर्धनासाठी २३ कोटी ७० लाखांच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. कोरोनाकाळात शासनाने आरोग्यसाठी निधीकडे प्राधान्य दिले होते . परिणामी रखडलेला निधी आता अर्थखात्याने पर्यटन विभागाकडे वर्ग केला आहे. शिवनेरी संवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग , वन विभाग, पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून विकासकामांचे प्रस्ताव पाठविले होते. यासाठी निधी उपलब्ध झाल्याने महाविकास आघाडी शासनाचे अभिनंदन यावेळी करण्यात आले. जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण, कर्मचारी भरती, नारायणगाव आरोग्य केंद्राचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर प्रगतिपथावर आहे. ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १४ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती बेनके यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार आय. ए, एस. अधिकारी संकेत भोंडवे यांना जाहीर झाला आहे. तर मानाचा शिवनेरीभूषण पुरस्कार डॉ. सदानंद राऊत यांना जाहीर झाला आहे. डॉ. राऊत यांचे मूळ गाव उंब्रज असून ते नारायणगाव येथे वास्तव्यास आहे. गरिबी व प्रतिकूल परिस्थितीत एम. डी. हे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या राऊत यांनी नारायणगावसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुरू केली. सर्पदंश झालेल्या ५००० रुग्णांचे त्यांनी प्राण वाचविले आहेत. गरीब गरजू रुग्णांसाठी मदत करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या सेवेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली गेली आहे.
१७ जुन्नर