फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:08 PM2021-10-19T15:08:41+5:302021-10-19T15:23:12+5:30
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ...
पुणे: फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़. समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली़.
या दोन्ही गावांतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सन २०१७ पासून तुकाई टेकडी फुरसुंगी येथे ३३ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प व या प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी लष्कर जलकेंद्रापासूनची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण नलिका, तेरा साठवण टाक्या आदी विकासकामे सुरू आहेत. या गावांचा नुकताच महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्याने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहेत. त्यामुळे या ठिकाणची पाणीपुरवठ्याची अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ३ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे़.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदकासाठी निधी
कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदक उभारण्यासाठीचा ३ कोटी रूपयांच्या खर्चासही समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़. या निधीच्या उपलब्धतेमुळे केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या निकषानुसार खंदक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व करांसहित सुमारे तीन कोटी सहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय रॉयल्टी आणि चाचणीचा खर्च अनुक्रमे ३४ हजार आणि ८४ हजार रुपये इतका होणार आहे.