प्रभागासाठी मंजूर झालेला निधी कोरोना रूग्णांसाठी खर्च करावा, नगरसेवकाची आयुक्तांना विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 02:09 PM2021-04-23T14:09:09+5:302021-04-23T14:09:59+5:30
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ
पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याच बरोबरीने प्रभाग क्रमांक ४ मध्ये देखील रुग्ण वाढीची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रभागातील कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात प्रभागासाठी मंजूर केलेला निधी रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करावा. अशी विनंती नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी आयुक्तांना केली आहे. आयुक्तांच्या वतीने पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांनी निवेदन स्वीकारले आहे.
शहरासोबतच प्रभागात रुग्ण संख्या वाढल्याने रुग्णांना बेड मिळणे कठीण होऊन बसले आहे. तसेच आवश्यक इंजेक्शनचा तुडवडा जाणवत आहे. सर्वसामान्य घरातील रुग्णांना रुग्णालयाचा खर्च करण्यात अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभागात इतर कामांपेक्षा प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या कामांचा निधी जनतेच्या आरोग्यासाठी खर्च करण्यात यावा अशी माझी धारणा आहे. इतर कामे ही परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर ही करता येऊ शकतात. मात्र सध्य परिस्थितीत जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात मंजूर केलेला सर्व निधी प्रभागातील जनेतेच्या आरोग्यासाठी खर्च करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.