काळ्या नव्हे ‘व्हाईट कोल’द्वारे ५८९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:13+5:302021-06-03T04:08:13+5:30
पुणे : कोरोनाकाळात वाढलेल्या मृत्यूंमुळे गॅस-विद्युतदाहिनीसोबतच लाकडाच्या सरणावर अंत्यसंस्कार करण्यास पालिकेने परवानगी दिली. त्याचवेळी प्रदूषणविरहित आणि धूर न होता ...
पुणे : कोरोनाकाळात वाढलेल्या मृत्यूंमुळे गॅस-विद्युतदाहिनीसोबतच लाकडाच्या सरणावर अंत्यसंस्कार करण्यास पालिकेने परवानगी दिली. त्याचवेळी प्रदूषणविरहित आणि धूर न होता अंत्यसंस्कार व्हावेत याकरिता पालिकेकडून ‘व्हाईट कोल’चा (ब्रिकेट) वापर करण्यात आला आहे. त्याचा वापर करून आतापर्यंत ५८९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यासाठी १४ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा खर्च आला.
कोविडबाधित मृतदेहांच्या अंत्यविधीची व्यवस्था विद्युत विभागाकडे आहे. शहरातील ससून रुग्णालयातील दरदिवशी सरासरी ४५ ते ५० मृतदेहांचे अंत्यविधी विद्युत विभागाने वेळेत केले. या मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीमधील शेड क्र. १ व २ या राखीव आहे. मात्र, धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अंत्यविधींसाठी लाकडाचा वापर न करता पांढरा कोळसा वापरण्यात येत आहे. १६ एप्रिल ते १८ मेपर्यंत एकूण ५८९ मृतदेहांचे अंत्यविधी करण्यात आले.
चौकट
पांढऱ्या कोळशात गंधकाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे लाकडापेक्षा कमी प्रदूषण होते. ज्वलनांक चार ते पाच हजार kcal/kg, राखेचे प्रमाण दोन ते पाच टक्के, शून्य टक्के आर्द्रता, लाकडापेक्षा जास्त कार्यक्षमतेने ज्वलन होत असल्याचे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.
चौकट
तीनशे किलो लाकडापेक्षा कमी
एका मृतदेहाच्या दहनासाठी सरासरी तीनशे किलो लाकूड लागते. आता अडीचशे किलो पांढऱ्या कोळशात मृतदेहाचे दहन होते. पांढऱ्या कोळशात दोन टक्क्यांपेक्षा जास्त पाणी नसते. त्यामुळे ज्वलनक्षमता जास्त असते तसेच यापासून धूर कमी होतो. दोन तासात मृतदेह जळून जातो.
पांढरा कोळसा असतो कशाचा?
शेतातील पीक निघाल्यानंतर उरलेले तुरटी/परटी, धाटे, धसकटे, उसाचे बगॅस, सोयाबीन, भूईमुगाची टरफले आदी अवशेषांपासून पांढरा कोळसा तयार होतो. हा शेतीला पूरक व्यवसाय आहे.