बारामती तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 07:38 PM2018-07-25T19:38:50+5:302018-07-25T22:14:40+5:30
पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.अंत्यविधीपूर्वी असणारे विधी देखील करण्यात आले. त्या ठिकाणी शोकसभादेखील घेण्यात आली.
बारामती : बारामती तालुक्यात मराठा मोर्चाचे आंदोलन दिवसेंदिवस पेटत असून आज तिसऱ्या दिवशी पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीपूर्वी असणारे विधी देखील करण्यात आले. त्या ठिकाणी शोकसभादेखील घेण्यात आली. हा मोर्चा मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजासह सर्व समाजबांधवांनी काढला. त्या ठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले; मात्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे आता समाजाने ठोक मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे.सोमवार (दि. २३)पासूनच बारामती परिसरात आंदोलन पेटत आहे. प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत असताना पोलीस प्रशासनाने मज्जाव करून पुतळ्याचे दहन करण्यास विरोध केला. पुतळ्याचे दहन करू न देता पुतळा ताब्यात घेतला. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध नोंदवला.या वेळी विकास बाबर म्हणाले, ‘‘हे सरकार आरक्षण व शेतकरी विरोधी आहे. मराठा समाज सनदशीर मार्गाने मागण्या मागत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. काहींनी कट रचून दोन समाजांत बारामतीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मनुवादी प्रवृत्तीचा, घटनेचा जाहीर निषेध करीत आहे. संविधानिक पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले आरक्षण होते. ते हक्काचे आरक्षण आम्हाला मिळावे, ही आम्ही सर्व समाजबांधवांच्या वतीने मागणी करीत आहे. तसेच, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या आंदोलनाला भाजपा विरहित सर्व पक्षसंघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुनील बनसोडे व बसपा महासचिव दादा थोरात आदींनी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे; तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, छत्रपती शिवाजी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारावे आदी मागण्या केल्या. तसेच, मराठा क्रांती मोर्चातील आरक्षणासह सर्व प्रमुख मागण्यांना सशर्त पाठिंबा दिला.यावेळी संतोष ढवाण, रमेश ढवाण, सूर्यकांत पिसाळ, सतीश काटे, शाहरुख इनामदार आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळीगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश देवकाते यांनी आभार मानले.