सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा, ३३ जणांना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:01+5:302021-05-30T04:10:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रेत बेकायदा जमाव जमवून दुचाकी रॅली काढत करोना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रेत बेकायदा जमाव जमवून दुचाकी रॅली काढत करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ३३ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निकालाविरोधात पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेत सरकारी वकिलांमार्फत फौजदारी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने ती स्वीकारून आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक परशुराम वनप्पा पिसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याचा १६ मे रोजी बिबवेवाडी परिसरात खून झाला होता. त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वाघाटेच्या दीडशे ते पावणेदोनशे साथीदारांनी करोना प्रतिबंधक नियम डावलून दुचाकीवरून बालाजीनगरमधून सातारा रस्तामार्गे कात्रज स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत सहभाग घेतला. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण वाघाटेच्या साथीदारांनी त्यांना न जुमानता जोरजोराने ओरडत नाकाबंदीवरील बॅरिकेड मोडून भरधाव वेगाने गाड्या चालविल्या. लॉकडाउन असताना स्मशानात गर्दी केली होती, तसेच मास्क व इतर नियमांचे पालन केले नव्हते, असे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे, तसेच बॅरिकेडची मोडतोड केली आहे. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण होत आहे. आरोपींची चौकशी केली नाही आणि त्यांना जामिनावर सोडले तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि प्रामाणिक तपास व पोलिसांच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होईल. या प्रकरणाचा योग्य तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केला.
....
दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
माधव वाघाटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो बालाजीनगर येथे राहात होता. त्याच्यावर धनकवडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे शक्य होते. मात्र, परिसरात टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी कात्रज स्मशानभूमीपर्यंत दीडशे ते पावणे दोनशे दुचाकीची रॅली काढून वाघाटेच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला. या रॅलीचे आयोजन कोणी केले होते, त्यासाठी कोणी पैसा पुरवला याचा शोध घेऊन आरोपींच्या अन्य साथीदारांना अटक करायची असल्याने आणि रॅलीत वापरलेल्या दुचाकी जप्त करायच्या असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सत्र न्यायालयाकडे केली होती.
.....