अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात; पेरणेच्या स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:28 AM2018-08-21T01:28:42+5:302018-08-21T01:28:51+5:30
मृतदेहाचा अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात करावा लागत आहे.
लोणी कंद : बाभळीच्या झाडाचा वेढा, शेजारी सतत वाहणारा दुर्गंधीयुक्त ओढा, चिखलाचे साम्राज्य , पाणी, वीज, रस्ता, निवारा अशी कशाची सोय नाही, ते ठिकाण म्हणजे पेरणे गावची स्मशानभूमी. परिणामी मृतदेहाचा अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात करावा लागत आहे.
पेरणे (ता. हवेली) गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजारइतकी आहे. पेरणे फाटा नवीन नागरीवस्ती झपाट्याने विकसित होत आहे. गावठाणाच्या उत्तर दिशेला गट नंबर ११९० मध्ये नऊ गुंठे जागेत स्मशानभूमी व दशक्रिया विधी घाट आहे. जागेमधूनच ओढा जात आहे. दहनविधीसाठी एक दफनपिंझरा आहे म्हणून स्मशानभूमी म्हणायचे. बाकी कुठलीही सुविधा नाही. गावाला वळसा घालून शाळेच्या पाठीमागून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खाचखळग्यांतूनच जातो. भुयारी गटाराचे काम अर्धवट, ड्रेनेजवर झाकणे नाहीत अशी परिस्थिती आहे. ड्रेनेजवर केवळ एक कडप्पा टाकला आहे. काही दिवसांपूर्वी त्यात रेश्मा जुजर मुजावर यांची ३ वर्षांची जैनब नावाची मुलगी पडली होती. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून वाचवली. अशी अनेक मुले खेळतात पडतात; पण ग्रामपंचायतीला जाग येत नाही. रस्त्याच्या कडेला बाभळीची झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहे. स्मशानभूमीमध्ये कायम चिखल असतो.
झाडेझुडपे वाढलेली, स्वच्छता नाही, पाणी, लाईट नाही. सर्वांत महत्त्वाचे भीमा नदीच्या पाण्याची थोडीफार पातळी वाढली तर हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. एकूण अंत्य्विधी करताना
नकोसे वाटावे, अशी दयनीय परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सोमवारी एक दशक्रिया विधी कार्यक्रम झाला. या वेळी श्रद्धांजली वाहताना जिल्ह्यातील एका नेत्याने सडकून टीका केली. समाजासाठी काहीतरी चांगले काम करा. शासकीय निधी मिळत नसेल तर वर्गणी काढा. मी पन्नास हजारांची मदत करतो, या शब्दांत संताप व्यक्त केला. मात्र तरीही ग्रामपंचायतीकडून अजूनही काहीच हालचाल झाली नाही.
या ग्रामपंचायत कमिटीचे काय चाललंय कळत नाही. गावाच्या विकासाचा काही आराखडा नाही. पूर्वी जागेचा प्रश्न होता, त्यामुळे काम करता आले नाही; आता स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे, तरी ग्रामपंचायतीने या कामाला प्राधान्य द्यावे.
- अण्णासाहेब टुले, माजी सरपंच
काही तांत्रिक अडचणी आहेत; मात्र लवकरच हे काम पूर्ण करू.
- रुपेश ठोंबरे, सरपंच, ग्रामपंचायत पेरणे