आत्महत्या केलेल्या नवविवाहितेवर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 04:57 AM2019-04-23T04:57:39+5:302019-04-23T04:57:46+5:30
माहेरच्या लोकांनी घर दिले पेटवून
सांगवी (जि. पुणे) : अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेने सासरच्या छळास कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. शिर्सूफळ (ता. बारामती) येथे गेल्या शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. कोमल सचिन आटोळे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. संतप्त नातेवाइकांनी कोमलचे अंत्यसंस्कार पतीच्या बंगल्यासमोर केले. तसेच सासरचे घर पेटवून देत पती, सासू, नणंद यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या बाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पती सचिन कोंडीराम आटोळे, सासू बकुळाबाई, (दोघे रा. शिर्सूफळ), नणंद नंदाबाई नवनाथ शिंगाडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांच्यावर आत्महत्येप्रकरणी, तर कोमलचे वडील प्रकाश जयसिंग गावडे, आई मंगल, भाऊ सागर, विशाल हरिभाऊ गावडे, विकास हरिभाऊ गावडे, सागर गावडे, संतोष गावडे (सर्व रा. पारवडी, ता. बारामती) यांच्यावर घर पेटवून दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, सासू आणि नणंद यांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या कोेमलकडे टीव्ही, सोन्याची अंगठी तसेच कारसाठी दीड लाखांची मागणी करीत छळ केला. त्याला कंटाळून तिने कीटकनाशक घेतले. तिचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘औषध समजून प्यायले कीटकनाशक’
कोमलच्या सासरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोमलने खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक प्राशन केले होते. मृतदेहावर सासरच्या बंगल्याच्या आवारातच अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी घरात घुसून घरातील संपूर्ण सामान जाळले. तसेच घरही पेटवून दिले.