जयंत नाडकर्णींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:40 PM2018-07-03T23:40:26+5:302018-07-03T23:40:59+5:30
माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी (८६) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी गोळीबार मैदान येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे : माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी (८६) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी गोळीबार मैदान येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सोमवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील कुलाबा येथील आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले होते. ते नौदलाचे १४वे नौदलप्रमुख होते.
नाडकर्णी यांच्या मागे दोन मुले असून त्यातील रवी हे भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर आहेत. अंत्यसंस्काराला त्यांच्यासह माजी हवाईदल प्रमुख एस. के. ग्रेवाल, व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा, राजीव किशोर व इतर अधिकारी उपस्थित होते.
नाडकर्णी हे मार्च १९४९मध्ये रॉयल इंडियन नेव्हीत रुजू झाले. त्यानंतर डार्टमाऊथ या रॉयल नेव्हल कॉलेजमध्ये त्यांनी प्राथमिक प्रशिक्षण घेतले. आयएनएस तलवार आणि आयएनएस दिल्लीचे ते कमांडिंग आॅफिसर बनले. पुढे पश्चिम क्षेत्राचे फ्लॅग आॅफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. नौदल उपप्रमुख होण्याआधी ते ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग आॅफिसर कमांडिंग इन चीफ होते. १ डिसेंबर १९८७ रोजी त्यांनी नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नोव्हेंबर १९९०पर्यंत ते या पदावर होते.