Mukta Tilak | "मुक्ताताई अमरे रहे..."; संघर्षशील नेतृत्त्व मुक्ता टिळक अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:09 PM2022-12-23T13:09:24+5:302022-12-23T13:09:24+5:30

"पुण्याच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व..."

Funeral of kasba peth bjp mla Mukta Tilak at Vaikunth Crematorium in Pune | Mukta Tilak | "मुक्ताताई अमरे रहे..."; संघर्षशील नेतृत्त्व मुक्ता टिळक अनंतात विलीन

Mukta Tilak | "मुक्ताताई अमरे रहे..."; संघर्षशील नेतृत्त्व मुक्ता टिळक अनंतात विलीन

googlenewsNext

पुणे : 'अमर रहे, अमर रहे, मुक्ताताई अमर रहे' अशा घोषणांत कसबा मतदार संघाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना पुणेकरांनी निरोप दिला. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले. मुक्ताताईंच्या अंत्यसंस्कारावेळी पुणेकरांनी, कार्यकर्त्यांनी आणि आप्तांनी अलोट गर्दी केली होती. मुक्ताताई त्यांच्या कष्टामुळे आज इथपर्यंत पोहचल्या होत्या. पुण्याच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. नगरसेविका, महापौर किंवा आमदार म्हणून त्यांचा जनसामान्यांशी मोठा संपर्क होता, मुक्ताताई जाण्याने आमच्या पक्षाची आणि समाजाची मोठी हानी झाली आहे, असं म्हणत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताताईंना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. ते म्हणाले, मुक्ताताई या संघर्षशील व्यक्तिमत्व होत्या. टिळकांचा संघर्षाचा वारसा त्यांच्यात होता. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर विधानसभा हळहळली. कार्यकर्ता कसा असतो, पक्षादेश काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच मुक्ताताई. गंभीर आजाराने ग्रासलेले असतानाही त्या राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या.

कसबा मतदार संघाच्या आमदार व माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे काल निधन झाले. आज सकाळी ९ ते ११ यावेळी अंत्यदर्शनसाठी राहत्याघरी त्यांना ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशामभुमीमध्ये मुक्ताताईंवर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

एअर ॲम्बुलन्सने मतदानासाठी हजर-

भाजपच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक (वय ५७) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर गुरुवारी (दि. २२) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर ॲम्बुलन्सने नेण्यात आले होते.

विमलाबाई गरवारे महाविद्यालयातून शालेय शिक्षण-

पुण्यातील विमलाबाई गरवारे महाविद्यालयातून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळक यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. मार्केटिंग विषयात एमबीएची पदवी मिळवली. पत्रकारितेचेही शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुक्ताताईंना श्रद्धांजली वाहिली. ते ट्विटमध्ये म्हणाले, "मुक्ता टिळक जी यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली. लोकोपयोगी मुद्दे उपस्थित करून त्यांनी आपला ठसा उमटवला आणि पुण्याच्या महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती."

सर्वाधिक मतांनी विजयी-

टिळक यांनी २००२ साली महापालिकेची पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. भाजपच्या गटनेत्या, शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. भाजपनं त्यांना २०१९ मध्ये कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.

वैशिष्ट्यपूर्ण कामे :
नाना वाडा येथे क्रांतिकारक संग्रहालय उभारले. सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल प्रकल्प, ओला व सुका कचरा प्रकल्प, महिलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, जेडंर बजेट ही महिलासाठीची संकल्पना सर्वप्रथम महापालिकेत राबविण्यासाठी प्रयत्न केले. वसुंधरा उद्याेग या लघु उद्याेग प्रकल्पातून महिलांना रोजगार निर्माण केला. प्रेरणा महिला मंडळाची स्थापना देखील मुक्ता टिळक यांनी केली.

Web Title: Funeral of kasba peth bjp mla Mukta Tilak at Vaikunth Crematorium in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.