काही दिवसांपूर्वी रस्त्यावरच केले होते अंत्यसंस्कार; आता तर नगरसेवकच झोपले चितेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 01:03 PM2021-03-05T13:03:44+5:302021-03-05T13:05:25+5:30
खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतर अवहेलना सुरू
पुणे : जीवन जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाला संघर्ष हा करावाच लागतो. एखादा व्यक्तीच्या जीवनातल्या जीवन यातना मेल्यावर तरी त्याला भोगाव्या लागू नयेत अशी किमान अपेक्षा असते. मात्र खराडी गावातील स्मशानभूमीचचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली असल्याने मेल्यावर देखील अग्नी देण्यासाठी स्मशानभूमीतील चिताच नशिबात नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा निषेध म्हणून नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी जिवंतपणी चितेवर झोपून अनोखे आंदोलन करत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
नगरसेवक जाधव म्हणाले, खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतर अव्हेलना सुरू आहे. खराडी परिसरातील मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावे लागत आहेत. यामुळे नागरिक नाराज आहेत. अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र केवळ आश्वासन देण्याच सत्र चालूच आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भयानक होती. काही शव जळत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे अर्धवट शव जळालेल्या अवस्थेत आम्हाला पर्याय शोधावे लागले.
चितेवर जिवंतपणी झोपण्याशिवाय निषेध नोंदविण्याच्या मार्गाशिवाय दुसरा पर्याय प्रशासनाने खराडी चंदननगरच्या लोकप्रतिनिधीं समोर ठेवला नाही. विरोधी पक्षातील नगरसेवक असल्यामुळे अशी हीन प्रकारची वागणूक आम्ही गेली चार वर्षे सहन करीत आलो आहोत, मात्र रस्त्यावर मैत जाळण्याइतकी वाईट वेळ फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आली. असा आरोप देखील जाधव यांनी केला.