परिंचे परिसरात बाजरी पिकावर बुरशीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:49 PM2018-10-02T23:49:35+5:302018-10-02T23:49:50+5:30
किडींचाही प्रादुर्भाव : उत्पादन घटीची शक्यता
परिंचे : परिंचे, वीर (ता. पुरंदर) परिसरात बाजरीवर बुरशी व अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाकडून परिसरातील बाधित पिकांची पाहणी करण्यात आली असून, ६० टक्के क्षेत्र बाधित असल्याचे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ यांनी सांगितले. दरम्यान, बाधित पिकाचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरण्या वेळेत झाल्या होत्या. त्यामुळे यंदा बाजरीचे पीक चांगले आले होते. तब्बल दोन महिने या परिसरात पाऊस पडत होता. याच काळात बाजरीचे पीक फुलोऱ्यात होते. दोन महिन्यांच्या काळात सूर्यदर्शन न झाल्यामुळे कणसांवर बुरशी व अळीचा प्रादुर्भाव झाला. ढगाळ हवामानामुळे याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पिकावर चिकटा पडला असून, कणसातून मधासारखा द्रव पाझरत असल्याचे शेतकरी रवींद्र श्रीरंग जाधव यांनी सांगितले.
बुरशी आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. संपूर्ण हंगाम वाया गेला असून, याचा पंचनामा करून भरपाईची मागणी शेतकरी राजेंद्र मांढरे यांनी केली. या वेळी डी. सी. जाधव, समीर दुधाळ आदी शेतकरी उपस्थित होते. या वेळी कृषी सहायक गणेश जगताप, सुरेश धुमाळ, कृषी पर्यवेक्षक संजीवन किरकोळ, हिंदुराव मोरे उपस्थित होते.