ज्येष्ठांच्या एकटेपणावर ‘मदतनिसा’ची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:42 AM2019-01-17T01:42:37+5:302019-01-17T01:42:49+5:30

वृद्धांना मदतीचा हात : स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

The furore of 'helper' on the loneliness of the senior citizens | ज्येष्ठांच्या एकटेपणावर ‘मदतनिसा’ची फुंकर

ज्येष्ठांच्या एकटेपणावर ‘मदतनिसा’ची फुंकर

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग 


पुणे : एकटेपणा भल्याभल्यांनाही नैराश्याच्या गर्तेत ढकलतो, तिथे ज्येष्ठांची काय कथा? ज्यांना अंगाखांद्यावर खेळवण्यात, ज्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात पूर्ण हयात गेली, ती पिल्ले आपापल्या आयुष्यात विसावतात व आई-वडील मात्र पूर्ण एकटे पडतात. वृद्धांच्या आयुष्यातील एकटेपणाच्या दु:खावर ‘मदतनिसा’ची फुंकर सुखद झुळूक ठरत आहे. ज्येष्ठांना मदतनिसाच्या माध्यमातून मदतीचा हात देता यावा, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी कंबर कसली आहे.


महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १ कोटी २१ लाख रुपये आहे; तर, पुण्यात सुमारे पाच ते सहा लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यांच्यापैकी अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. बहुतांश ज्येष्ठांची मुले-मुली शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशी किंवा अन्य शहरांमध्ये स्थिरावलेली असतात. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील कामे पार पाडणेही अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना अवघड होऊन बसते. दुकानातून लहान-मोठ्या वस्तूंची खरेदी, डॉक्टरांकडील तपासणी, औषधोपचार, बिल भरणे अशा अनेक कामांमध्ये त्यांना मदतीची गरज असते. त्यांची हीच अडचण आणि गरज लक्षात घेऊन पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.


श्री सद्गुरू ग्रुप या संस्थेतर्फे सभासद ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी, सोबतीसाठी आपणहून पुढाकार घेतात. सध्या संस्थेचे ४००० सभासद असून, गेल्या पाच वर्षांपासून ज्येष्ठांना मदतनीस पुरवण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. महिन्याभरात साधारणपणे दहा-बारा ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जात असल्याचे सहसचिव वासुदेव जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकेकट्या ज्येष्ठांना बरेचदा एकाकीपण जाणवते. गप्पा मारण्यासाठी, सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी, वाचन करून दाखवण्यासाठी त्यांना सोबतीची गरज असते. मदतनिसांच्या माध्यमातून त्यांची गरज पूर्ण केली जाते. विश्वासू मदतनिसांचीच निवड केली जात असल्याने फसवणुकीची शक्यता राहत नाही. संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

१०९० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध

  • पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनिसाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी १०९० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • ज्येष्ठांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास त्यांच्यांशी गप्पा मारणे, सिलिंडर जोडून देणे, दवाखान्यात घेऊन जाणे, वाचन करून दाखवणे आदी कामांसाठी मदतनिस म्हणून मार्शल पाठवले जातात.
  • दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, मदतीसाठी महिन्यातून साधारणपणे ३०-३५ फोन असल्याचे पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
  • अ‍ॅमेनोरा येस फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी क्षुधा शांती अभियान हाती घेतले आहे. फाउंडेशनतर्फे गरीब, असहाय, आजारी असणाऱ्या वृद्धांना घरपोच जेवणाचा डबा मोफत दिला जाणार आहे. घरातील एक जण आजारी असेल, तर दुसरा बाहेर जाऊन काही आणू शकत नाही की बनवू शकत नाही. बरेचदा खानावळीचा किंवा हॉटेलचा डबाही परवडत नाही पण भीक मागू शकत नाही. अशा कुटुंबांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रारंभीच्या टप्प्यात सदाशिव पेठ, नारायण पेठ, सिंहगड रोड, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण आदी ठिकाणी सुविधा पुरवली जाईल, असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

Web Title: The furore of 'helper' on the loneliness of the senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.