Pune | फुरसुंगी, उरुळी देवाची गावांना कालव्यातूनच होणार पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:22 PM2022-12-20T12:22:41+5:302022-12-20T12:23:39+5:30
खडकवासला कालव्यात पाणी सोडले जाणार...
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये कचरा डेपोमुळे भूगर्भातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून सध्या या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या गावांसाठी पाणी योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण होईपर्यंत या गावांना जलसंपदा विभागाकडूनच पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी खडकवासला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठी नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, कचरा डेपोमुळे बाधित फुरसुंगी व देवाची उरुळी येथील भूगर्भातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे या गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. या दोन गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर टँकरची मागणी कमी होऊन टँकरसाठी लागणाऱ्या पैशांची बचत होणार आहे. मात्र, या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होईपर्यंत जलसंपदा विभागाकडून या गावांना पाणी दिले जाणार आहे.
याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, “फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर जलवाहिन्या टाकण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. लष्कर जलकेंद्रातून फुरसुंगीला पाणी देण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचेही जलसंपदा विभागाला सांगण्यात आले होते. मात्र, आता या गावांची नगरपालिका होणार आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना प्रस्तावित आहे. या योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत जलसंपदा विभागाला या गावांसाठी कालव्यात पाणी सोडावे लागणार आहे.”