कचरा प्रकल्पांचा उद्देश ‘वीज निर्मिती’चा नाहीच : ज्ञानेश्वर मोळक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:41 PM2020-01-02T20:41:05+5:302020-01-03T16:54:10+5:30
कचऱ्यांवरील प्रक्रिया खर्च टाळणे अशक्य
पुणे : फुरसुंगीच्या कचरा डेपोवर टाकल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यामुळे त्याठिकाणी दुर्गंधी पसरते तसेच हा कचरा जिरत नाही, पाण्याचे प्रदुषण होते, वास येतो अशी अनेक कारणे देत ग्रामस्थांनी हा कचरा टाकायला विरोध केला होता. त्यावर तोडगा काढण्यात आल्यावर पाच-पाच मेट्रिक टन बायोगॅसचे प्रकल्प उभारुन वीज निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, वीज निर्मिती हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश नसून ओला कचरा जिरवणे हा मुख्य उद्देश असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
शहरातील ओला आणि सुका कचरा गोळा करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याबद्दल वारंवार जनजागृती केली जाते. परंतू, नागरिकांकडून अद्यापही त्याबद्द्ल गांभिर्य बाळगले जात नाही. हा कचरा पालिकेच्या यंत्रणेलाच वेगळा करावा लागत असल्याचे चित्र आहे. फुरसुंगी कचरा डेपोबाबत झालेल्या आंदोलनांनंतर शहराच्या विविध भागांमध्ये ओला कचरा जिरवून त्यापासून बायोगॅस निर्मिती आणि त्या बायोगॅसपासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले. परंतू, या प्रकल्पांचा मुख्य उद्देश हा ओला कचºयाची विल्हेवाट लावणे हा होता. त्यापासून वीज निर्मिती हा दुय्यम मुद्दा आहे. त्यामुळे वीज निर्मिती झाली नसल्याची आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु असल्याचे मोळक म्हणाले.
हे प्रकल्प सुरु झाले तेव्हा प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे हे प्रकल्प आता अत्याधुनिक करणे आवश्यक आहे. त्याचे स्ट्रक्चर जुने असून प्रकल्पांची दुरुस्ती आणि बांधकाम अद्ययावत असणे आवश्यक आहे. हा कचरा पुर्वी वाहतूक करुन कचरा डेपोपर्यंत न्यावा लागत होता. त्यामुळे त्याचा खर्च होतच होता. प्रकल्पांसाठी खर्च झाला अशी ओरड करणे चुकीचे आहे. केवळ यंत्रणेवर विसंबून राहून बदल घडणार नाही. कचºयाची समस्या दूर करावयाची असल्यास नागरी सहभागही तेवढाच आवश्यक असून सामाजिक संस्थांनीही यामध्ये सक्रिय काम करावे असे आवाहन मोळक यांनी केले.