संचारबंदी असतानाही मंचरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:42+5:302021-04-16T04:11:42+5:30
आंबेगाव तालुका कोरोणाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी तब्बल १६४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात ...
आंबेगाव तालुका कोरोणाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी तब्बल १६४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात मंचर शहरातील २६ रुग्णांचा समावेश आहे. वाढत्या रुग्ण संखेने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णांना बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक अजूनही काळजी घेताना दिसत नाही. सरकारने आजपासून मिनी लॉकडाऊन लागू केला असून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आज मंचर शहरात फेरफटका मारला असता नियमाचे पालन होताना दिसत नव्हते. दुचाकी चालक कारण नसताना रस्त्यावरून फिरताना दिसले. अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. मात्र किराणा दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती. हॉटेल व्यावसायिक पार्सल सेवा देण्यासाठी व्यवसाय करत होते. मंचर-घोडेगाव रस्त्यावर खर्डीनाला येथे असलेला भाजीबाजार पूर्णपणे भरला होता. विक्रेते दाटीवाटीने बसले होते.अनेक विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सचा तर अक्षरशा फज्जा उडाला होता. कोरोनाचा धोका वाढला असूनही गृहिणी भाजी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिस कर्मचारी होते. मात्र ते वाहनचालकांकडे कुठलीही चौकशी करत नव्हते. सर्व रस्त्यांच्या बाजूला वाहने मोठ्या प्रमाणावर पार्किंग करण्यात आली होती. पुणे-नाशिक महामार्गावरून नेहमीप्रमाणेच वाहनांची वर्दळ सुरू होती. एकूणच सरकारने जाहीर केलेली संचारबंदी नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसले. नागरिकांनी नियमाचे पालन करावे. भाजीबाजारात होणारी गर्दी कमी झाली पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी लक्ष घालावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरडे यांनी केली आहे.
--
फोटो ओळी : १५ मंचर संचारबंदी फज्जा
फोटोखाली: मंचर शहरातील भाजीबाजार दिवसभर गजबजला होता.