शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे कातकरी समाजातील मुलांचे भवितव्य अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:25+5:302021-07-20T04:08:25+5:30
-- लोकमत न्यूज नेटवर्क: आघाणे (ता. आंबेगाव) या अतिदुर्गम भागातील आदिम जमातीतील कातकरी समाजातील मुलांना शिक्षण देणारी वनदेव विद्या ...
--
लोकमत न्यूज नेटवर्क:
आघाणे (ता. आंबेगाव) या अतिदुर्गम भागातील आदिम जमातीतील कातकरी समाजातील मुलांना शिक्षण देणारी वनदेव विद्या मंदिर, आघाणे ही विशेष शाळा शाश्वत संस्थेने सुरू केली होती. गेले २१ वर्षांपासून ही शाळा सुरू होती. या शाळेमध्ये पहिली ते सहावी या वर्गात साधारणपणे ६० आदिवासी कातकरी जमातीतील मुले शिक्षण घेत आहेत. परंतु ही शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून, १६ जुलै रोजी वनदेव विद्या मंदिर, आघाणे या ठिकाणचे शाळेतील सर्व साहित्य हलविण्यात आले आहे.
शाळा बंदच्या निर्णयाला आघाणे ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीनेही विरोध केला आहे. २१ वर्षांपासून ही शाळा संस्थेने गावच्या ग्रामसभेशी चर्चा करून व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केली होती. परंतु शाश्वत संस्थेने आता शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेला व स्थानिक ग्रामस्थांशी कोणताही संवाद न साधता घेतला असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
स्वातंत्र्यानंतर कुठेतरी कातकरी समाज हा मुख्य प्रवाहात येऊ लागला असून, कातकरी समाजातील पहिली पिढी शिक्षणप्रवाहात येत असताना, त्यांच्यासाठी सुरू असलेली शाळा बंद करणे म्हणजे या समाजाचे भविष्य धोक्यात येण्यासारखे आहे. त्यामुळे ही शाळा बंद करण्याबाबत संस्थेने पुनर्विचार करावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तसेच, शाश्वत संस्थेकडे ही शाळा सुरू ठेवण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर आदिवासी विकास विभागाने ही शाळा ताब्यात घेऊन सुरू ठेवण्याची मागणी अनेक आदिवासी संघटनांनी केली आहे.
---
कोट -१
"पेसा कायद्यानुसार ग्रामसभेशी चर्चा न करता शाळा आमच्या मालकीची आहे, आम्ही वाटेल ते करू, या प्रवृत्तीतून शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. संस्थेने या निर्णयाचा पुनर्विचार करावा"- सरपंच चिंतामण वडेकर
--
कोट २
"संस्थेच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाल्यानंतर शाळा बंदीमागील भूमिका स्पष्ट केली जाईल. नागरिक पालक यांच्या भावनांचा विचार आणि शासनाचे नियम दोन्ही बाजूंचा विचार केला जाईल. - विश्वस्त अशोक आढाव .