नियुक्तीसाठी भावी अधिकाऱ्यांचा सरकारला दंडवत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:49 PM2019-09-06T15:49:51+5:302019-09-06T15:52:19+5:30

"गेल्या अनेक महिन्यांपासून आमची निवड होऊनही आम्ही अजून बेरोजगारीचा सामना करीत आहोत...

Future officers in movement condition for appointment by government | नियुक्तीसाठी भावी अधिकाऱ्यांचा सरकारला दंडवत

नियुक्तीसाठी भावी अधिकाऱ्यांचा सरकारला दंडवत

Next
ठळक मुद्देराज्यसेवेचे ३७७, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकचे ८३२ अधिकारी नोकरीच्या प्रतीक्षेत

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा व सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापही नियुक्त करून घेण्यात आलेले नाही. शासनाने त्वरित नियुक्त करून घेण्याच्या मागणीसाठी या भावी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सरकारकडे लोटांगण घातले. तसेच नोकरीवर रुजू करून घेण्याची मागणी करत भीक मांगो आंदोलन करीत बेमुदत उपोषण या अधिकाऱ्यांनी सुरु केले आहे.

राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार यासह सहायक मोटार वाहन निरीक्षक असे वर्ग १ व वर्ग २ पदावरील अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. समांतर आरक्षणाच्या खटल्यामुळे ही नियुक्ती रखडली आहे. मात्र, यातील ९५ टक्के उमेदवारांचा याच्याशी संबंध नाही. न्यायालयीन लढाईमध्ये या अधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या टोलवाटोलवीमुळे निवड होऊनही हे अधिकारी आज हलाखीचे जीवन जगत आहेत.

सकाळी पुणे स्टेशनजवळील गांधी पुतळयाला अभिवादन करून तेथे त्यांनी दंडवत घातला. नोकरीवर तात्काळ रुजू करून घ्यावे, अशी मागणी केली. तेथून हे सर्व जवळपास ६००-७०० अधिकारी विधानभवन येथे आले. तेथे सरकारला दंडवत घालत विनवणी केली. कठोर परिश्रम करून मिळालेल्या नोकरीवर त्वरित रुजू करून घेण्याची मागणी करत भीक मांगो आंदोलन केले व बेमुदत उपोषण सुरु केले. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाचे ८३२, तर राज्यसेवेच्या ३७७ पदांचा समावेश आहे. राज्यसेवेच्या निकालाला १६ महिने, तर सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या निवडीला ३२ महिने उलटून गेले आहेत. तरीही हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

याबाबत बोलताना अभिजित बाविस्कर म्हणाले, "गेल्या अनेक महिन्यांपासून आमची निवड होऊनही आम्ही अजून बेरोजगारीचा सामना करीत आहोत. रात्रंदिवस एक करून राज्यसेवा उत्तीर्ण झालो. मात्र, नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे सगळीकडून दबाव येत आहे. मानसिक, सामाजिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने आमच्या मेहनतीचा विचार करून त्वरित नियुक्ती करावी. तहसीलदार साळुंखे साहेब यांच्याकडे राज्यसेवा अधिका?्यांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे."

रोहित पवार म्हणाले, "दोन-अडीच वर्षे उलटूनही आम्हाला नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक कलह वाढत आहे. आम्हा मुलांमध्ये नैराश्याची भावना येत असून, प्रचंड मेहनतीने जे यश मिळवले, त्याच्या नियुक्तीसाठी रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन आणि उपोषण करावे लागत आहे, याचे वाईट वाटते. देशसेवा करण्याची इच्छा मनात बाळगून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लढा द्यावा लागत आहे."
-------------------
विविध पक्ष, संघटनांचा उपोषणाला पाठिंबा
वर्ग १ आणि वर्ग २ च्या भावी अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या या उपोषणाला शहरातील विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या अधिकाऱ्यांना शासनाने त्वरित नियुक्ती देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका त्यांनी मंडळी. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे, एमपीएससी स्टुडन्ट राईट्सचे महेश बडे यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवत सरकारकडे त्यांच्या नियुक्तीची मागणी केली.

Web Title: Future officers in movement condition for appointment by government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.