भावी पोलिसांना आतापासुनच नाइट ड्यूटी! पाेलीस शिपाई पदाचा अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेतच मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 06:52 PM2022-11-27T18:52:54+5:302022-11-27T18:53:10+5:30
अर्ज भरण्यास तीन दिवसाचा अवधी उरला असताना संकेतस्थळ सातत्याने हँग होतंय
धनकवडी : पाेलीस शिपाई भरतीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. अर्ज भरण्यास तीन दिवसाचा अवधी उरला आहे, संकेतस्थळ सातत्याने हँग होत असून, अर्ज भरला जात नसल्याने उमेदवारांना सायबर कॅफेमध्ये रात्र -रात्र जागून अर्ज दाखल करावे लागत आहेत. त्यामुळे भावी पोलिसांना आता पासूनच 'नाइट ड्यूटी' लागल्याचे चित्र दिसून येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
मुंबई शहरासह राज्यातील विविध पाेलीस आयुक्तालय, जिल्हा ग्रामीण पाेलीस दल, लाेहमार्ग पाेलीस आणि एसआरपीएफ दलात पाेलीस शिपाई पदासाठी भरती हाेणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सुमारे आठ ते दहा वर्षानंतर प्रथमच एवढ्या माेठ्या प्रमाणात जागा भरणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी माेठ्या संख्येने अर्ज भरत आहेत.
अर्ज भरण्याची सुरूवात ९ नाेव्हेंबर राेजी झाली असून रात्री ३० नाेव्हेंबर राेजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यास शेवटचे काही दिवस उरले असल्याने अर्ज भरणाऱ्यां उमेदवारांची संख्या वाढली असल्याचे संकेतस्थळाच्या सर्व्हरवर ताण वाढला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही माहिती भरलेला अर्ज शेवटी सबमिट हाेत नसल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे शहरातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. पाेलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर उमेदवार वेळेत अर्ज भरण्याकडे दूर्लक्ष करतात. त्यामुळे शेवटी अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढते आणि सर्व्हरवर ताण वाढून तांत्रिक अडचणी निर्माण हाेतात असे सायबर कँफे चालकांनी सांगितले.
''यंदा माेठ्या संख्येने भरती हाेणार आहे. आमचं वय निघून चाललंय? कुटुंबियांनी ही शेवटची संधी म्हणून फॉर्म भरण्यास होकार दिला आहे ? त्यातच आता सर्व्हर डाऊन झाल्याने काही सुचेनासे झाले असल्याचे अर्ज करण्यास आलेल्या युवतीने सांगितले.''
''मी पाच सहा दिवसांपासून फाँर्म भरत आहे. सर्व्हर डाऊड मुळे फाँर्म भरला जात नाही म्हणून रविवारी रात्री १ वाजता सायबर कँफे मध्ये गेलो होतो. त्यानंतर पहाटे पाच वाजता गेला परंतु शुल्क भरताना सिस्टीम बंद होत असल्याचे युवकाने सांगितले.''